गॅसचोरी करणाऱ्या एजन्सींवर गुन्हे दाखल करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

34

सामना प्रतिनिधी । मुंबई

गॅसचोरी आणि सिलिंडरचा काळाबाजार यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नुकतीच डोंबिवली येथे गॅस गोडाऊनवर धाड टाकून चोरी करताना गॅस एजन्सीच्याच लोकांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे लक्षात घेता अशाप्रकारे काळाबाजार करणाऱया संस्थांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी ‘भारत पेट्रोलियम’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे केली.

डोंबिवली येथील गॅस गोडाऊनमध्ये एका सिलिंडरमधून दोन दोन किलो गॅस काढून व्यापारी वापरासाठी असलेल्या सिलिंडरमध्ये भरून चढय़ा दराने विकण्याचा गोरखधंदा दै. ‘सामना’ने उजेडात आणला. कक्षाने केलेल्या आग्रही मागणीनंतर गॅसचोरी करणाऱया संबंधितांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांच्या हिताबरोबरच सुरक्षिततेला कंपनीमार्फत प्राधान्य देण्यात येत असून आणखी चांगल्या सुविधा ग्राहकांना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समन्वयक आशीष परुळेकर, मुंबई प्रादेशिक प्रबंधक राजेश कुमार, मुंबई प्रादेशिक समन्वयक मुकुंद तांदळे आणि ठाणे-रायगड प्रादेशिक समन्वयक जगन्नाथ यांनी दिली. यावेळी शिष्टमंडळात कोषाध्यक्ष अशोक शेंडे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय मालवणकर, निखिल सावंत, देवीदास माडये, कक्षप्रमुख बबन सकपाळ, विलास पाटील, कृष्णकांत शिंदे, बळीराम मोसमकर, उपकक्षप्रमुख विजय पवार आणि समीर हडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
– प्रत्येक एजन्सीच्या गोडाऊन आणि वितरणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करा.
– गॅस एजन्सीच्या पावतीवर आणि ऑनलाइन सिलिंडर बुकिंगनंतर कंपनी पाठवत असलेल्या संदेशात गॅस आणि सिलिंडरचे वजन नमूद करावे.
– प्रत्येक डिलिव्हरी मॅनजवळ वजनकाटा असणे बंधनकारक करावे. वजन ग्राहकांसमोर करावे.
– ग्राहकांच्या माहितीसाठी कंपनीचे ग्राहक ऍप असावे.
– गॅस सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ग्राहकांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱया भरपाईबाबतची माहिती ऍपद्वारे ग्राहकांना द्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या