शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

सामना प्रतिनिधी। धर्माबाद

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी शिवसेनेच्या वतीने ‘ढोल बजावो’ आंदोलन करण्यात आले. शेतकरी विविध समस्येने त्रस्त असताना तालुक्याच्या विविध विभागाच्या प्रशासनाकडून केवळ वेळ काढूपणा होत आहे. यामुळे सर्वसामान्यांची कामे प्रलंबित आहेत. अतिवृष्टी होऊन आठवडा झाला तरी अद्यापही नुकसानीचे पंचनामे अपूर्ण आहेत. यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी हे ढोल आंदोलन करण्यात आले.

नाफेडमार्फत खरेदी झालेल्या हरभरा व तुरीचे पैसे अद्यापही मिळाले नाही. या सोबतच तालुक्यातील महावितरणची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. तालुक्याचे पिककर्ज वाटपाचीही कामे उदिष्टापेक्षा कमीच झाली आहे. यामुळे शिवसेना जि.प.सदस्या पद्मा नरसारेडी सतपलवार व आकाश रेड्डी येताळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनास निवेदनही देण्यात आले.
शहरातील पानसरे चौकातून हा मोर्चा निघाला. यावेळी शिवसेना जिंदाबाद, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

या मोर्चात शेकडो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. आमच्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन शिवसेना स्टाईलने केले जाईल. काही उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.