दसरा मेळावा शिवसेनेचाच! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असे काहीच नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. मूळ शिवसेना कोणाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे. गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. पण जनता यापूर्वीही आमच्या सोबत होती आणि यापुढेही राहील. सगळय़ांना सोबत घेऊन चालणे हीच आमची भूमिका असून आमची मते आणि भूमिका ज्यांना पटेल ते आमच्या सोबत येतील!

दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज करत आहोत. मात्र तो न स्वीकारून हे ‘खोके सरकार’ दडपशाही करत आहे. पण रीतसर परवानगी मागूनही मिळाली नाही तरी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

नागपूर दौऱ्यावर आलेले आदित्य ठाकरे यांचे विमानतळावर शेकडो शिवसैनिकांनी ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांचा आणि राज्यातील ‘ईडी’ सरकारचा खरपूस समाचार घेतला. ‘दसरा मेळाव्याची परवानगी मिळते की नाही ते नंतर बघू, पण या गद्दारांना निमित्त पाहिजे होते. कारण लोकांसमोर त्यांचा मुखवटा फाटलेला आहे. माझ्या शिवसंवाद यात्रांना महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘खोके सरकार’ बिथरलेले आहे. गद्दार निमित्त शोधत होते. ते त्यांना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मिळाले,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.

शहरांमध्ये अर्बन फार्मिंगचे उपक्रम राबवावेत!
अमर शहीद विजय कापसे स्मृती प्रतिष्ठानतर्फे नाग मंदिर नवीन सुभेदार येथे आयोजित तान्हा पोळय़ाचे उद्घाटनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, ‘शहरे वाढत आहेत आणि शहरी लोपं शेतीपासून दूर जात आहेत. आज शहरातील मुलांना भाजी कुठून येते विचारले तर मॉलमधून येते असे सांगतात. शेती म्हणजे काय? त्यामागे शेतकऱयांची मेहनत किती आहे हे शहरी मुलांना कळण्यासाठी शाळांनी पुढाकार घेऊन शहरात अर्बन फार्मिंगसारखे उपक्रम राबविले पाहिजेत.’ यावेळी आमदार दृष्यंत चतुर्वेदी, महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, महानगर जिल्हाप्रमुख नगरसेवक किशोर कुमेरीया, शहरप्रमुख दीपक कापसे, प्रवीण बरडे, सुरेखा खोब्रागडे आदी उपस्थित होते.

नांदगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट
नागपूर जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्यातील नांदगाव येथे ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या बंधाऱ्यातून शेतांमध्ये राख सोडली जात आहे. आदित्य ठाकरे यांनी त्याची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त लोकांची भेटही घेतली. ऊर्जा प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेमुळे लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असून हा प्रश्न निकाली लावण्यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढच्या आठवडय़ात भेट घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देऊ, असेही ते म्हणाले.

ढोलताशांचा गजरात जंगी स्वागत
आदित्य ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर शिवसैनिक आणि नागरिकांनी जंगी स्वागत केले. ढोलताशांचा गजर आणि ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. हजारो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. त्यात महिलांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. आमदार दृष्यंत चतुर्वेदी, महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, नितीन तिवारी, नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख राजू हरणे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.