अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे

सामना ऑनलाईन । अचलपूर

शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन अनेक वेळा महाराष्ट्राला घडले आहे. आजही पुन्हा ते दिसून आले. अपघात झाल्याचे दिसल्यानंतर काही लोक मदत करावयाचे सोडून पुढे निघून जातात. मदतीचा हातही पुढे करत नाही, परंतु शनिवारी एकनाथ शिंदे यांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.

शनिवारी दोन दिवसीय मेळघाट दौरा करून अमरावतीकडे परतयेत असताना अचलपूरजवळ ऑटो रिक्षाचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवला. यानंतर अपघातग्रस्तांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार आनंदरावजी अडसूळही उपस्थित होते. अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर एकथान शिंदे आपल्या ताफ्यासह पुढे रवाना झाले.

दरम्यान, मेळघाट भागातील आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात सेमाडोह, हरिसाल, धारणी, बैरागड, रंगुबेली, चिखलदरा, अचलपूर येथील आरोग्य केंद्रांना एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मेळघाट विभागातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना 100 नेब्यूलायझर, 7 वार्मर तसेच 60 हजार किलोचे (600 क्विंटल) सकस आहार वाटप करण्यात आले आहे.