निकृष्ट मालाची विक्री; ग्राहक संरक्षण कक्षाची अन्न व औषध कार्यालयावर धडक


सामना प्रतिनिधी । पेण

ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना निकृष्ट दर्जाची मिठाई व अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्याकरीता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने पेण येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयावर धडक दिली.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख रमेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख एहतेशाम पेनवाल, शशिकांत डोंगर, नंदकुमार मोकल, उमेश सावंत, सुनील पाटील, संदीप दबके, किरण तावजरे, धीरज बंधू, गोविंद जोशी या पदाधिकाऱ्यासह शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते.

पेण शहरासह तालुक्यातील गावांमध्ये भेसळयुक्त व नकली खव्यापासुन बनविलेली मिठाई, मान्यता नसलेल्या रंगांपासुन बनविलेले निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ, तारीख गेलेले पॅकेट बंद पदार्थ तसेच तारीख उत्पादकाचे नाव, वजन, किंमत न छापलेले वेफर्स व अन्य पदार्थांची बाजारात विक्री करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची 20 लिटरच्या बाटलीत कोणत्याही प्रकारची परवानगी व आयएसआय मानांकन न घेता दूषित पाण्याची विक्री करण्यात येते. खराब झालेले दुग्धजन्य पदार्थ, रोगट व मेलेल्या कोंबड्या, केमिकल द्वारे पिकवलेली केळी व फळे यांची तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असुन त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आपला नफा वाढविण्यासाठी तालुक्यातील अनेक व्यापारी ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त व निकृष्ट माल विकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे करण्यात आली आहे. या वेळी अनेक भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांची नावासह यादी नंदु मोकल यांनी वाचून दाखवली तसेच अन्न व औषध प्रशासनाने त्याच्यावर कारवाई न केल्यास भेसळ करणार्‍यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्यात येईल असा इशारा मोकल यांनी दिला.