शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, रायगडातील खारबंदिस्तीची कामे २ दिवसांत सुरू करणार

1

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

वर्षानुवर्षे खारबंदिस्तीच्या दुरुस्तीची कामे न केल्याने खाडीतील पाणी शिरून रायगड जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती नापीक होते. याबाबत शिवसेनेने विधानसभेत आवाज उठवून शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. याची दखल घेत परिवहन व खारभूमीमंत्री दिवाकर रावते यांनी आज मंत्रालयात बैठक बोलावून खारबंदिस्तीची कामे दोन दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेतीची नापिकी थांबणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

समुद्राच्या भरतीमुळे खारबंदिस्तीला भगदाडे पडून खाडीचे पाणी नेहमी शेतामध्ये शिरते. याचा फटका शेकडो एकर शेतीला बसत असल्याने भातशेतीचे मोठे नुकसान होते. अक्षरश: खर्चही निघत नाही. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार मनोहर भोईर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून खारबंदिस्तीच्या विषयाला वाचा फोडली. त्याची दखल घेत दिवाकर रावते यांनी आज मंत्रालयात तातडीने बैठक बोलावून ही कामे दोन दिवसांत सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. उद्यापासून पर्यावरण सचिव तसेच अन्य अधिकारी आमदार मनोहर भोईर यांच्यासह खारबंदिस्तीची पाहणी करणार आहेत. या बैठकीला पर्यावरण, जलसंपदा, खारभूमी विभागाचे अधिकारी व रायगड जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.