विजबिल थकीत शेतकऱ्यांना दिलासा; ७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सामना ऑनलाईन । पाचोरा

भडगाव तालुक्यातील वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत बिल भरण्याची मुदत वाढवून मिळाली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून वीजबिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी हवालदिल झाला होता. आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा व आधार मिळावा म्हणून शासन दरबारी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱयांची व्यथा मांडली. वीज वितरण कंपनीतर्फे भडगाव – पाचोरा तालुक्यातील थकीत वीजबिलधारक शेतकऱयांना ७ नोव्हेंबरपर्यंत बिल भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यात १८ हजार ४०८ शेतकऱयांकडे १२७ कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. तसेच भडगाव तालुक्यात ९ हजार ८०५ शेतकऱयांकडे ९४ कोटी थकबाकी आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने धडाक्याने शेतकऱयांनी वीज कनेक्शन तोडणी मोहीम सुरू केली होती. याला शिवसेने केलेल्या विरोधामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत पाचोरा – भडगाव तालुक्यांत वीज तोडणी मोहीम थांबविण्यात आली आहे. तीन महिन्यांचा एक हप्ता धरून थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱयांनी आता आपले वीजबिल या पध्दतीने भरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे व वीज वितरण कंपनीचे के.डी. मोरे व गुप्ता यांची उपस्थिती होती.