शिवसेनेने विधिमंडळासमोर दाखवला मराठी बाणा


सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी भाषादिनानिमित्त मंगळवारी विधिमंडळ पटांगणात छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, सभापती, उपसभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते उपस्थित होते; परंतु ज्या शिवसेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे सत्व आणि तत्त्व आहे त्या शिवसेनेलाच डावलण्यात आले. शिवसेनेच्या एकाही नेत्याला बरोबर घेतले नाही. त्यामुळे संतापून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अखेर एकटय़ाने पटांगणात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून विधिमंडळासमोर शिवसेनेचा मराठी बाणा काय आहे ते दाखवून दिले.

शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्र्यांनी निदान निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेल्या युती सरकारमधील गटनेते एकनाथ शिंदे यांना तरी बरोबर घ्यायला हवे होते, असे दिवाकर रावते म्हणाले. शिवसेनेने नेहमीच मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी त्वेषाने लढा दिला आहे. हिंदुत्व आणि मराठी हेच शिवसेनेचे सत्व आणि तत्त्व आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला बरोबर घेतले;पण शिवसेनेच्याच नेत्यांना डावलले ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत रावते यांनी सरकारवर आगपाखड केली.

तर विधिमंडळात बिगर मराठी आमदार असते

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नसती तर विधिमंडळात ५० ते ६० टक्के बिगर मराठी आमदार असते. मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम तरी या ठिकाणी झाला असता की नाही हेदेखील सांगता येत नाही. केवळ शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेमुळेच विधिमंडळात मराठी आमदार आहेत. तसेच मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो हे सरकारने लक्षात घ्यावे, असा टोलाही रावते यांनी लगावला.

शिवसेनेचा अधिकार डावलल्याचे दिसल्यानंतर माझ्यासारखा शिवसैनिक अस्वस्थ झाला. त्यामुळेच मी शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने आणि ज्या सहकाऱयांमुळे मी विधिमंडळात आहे त्या सहकाऱयांच्या वतीने स्वत: पटांगणात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि विधिमंडळाला शिवसेनेचा मराठी बाणा दाखवून दिला. 

-दिवाकर रावते, परिवहन मंत्री