मुंबईत शिवसेनाच नंबर वन; ठाण्यात एकहाती सत्ता!

मुंबईमुंबई, ठाणे, उल्हासनगरसह राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. मुंबईत कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी ८४ जागा जिंकत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपने मुंबईत जोरदार मुसंडी मारली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यांशी जिव्हाळय़ाचे नाते असलेल्या ठाण्यात तर शिवसेनेला दणदणीत आणि निर्विवाद कौल मिळाला. एकहाती सत्ता मिळवत ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. दरम्यान, उल्हासनगरातही शिवसेनेने २५ जागांवर विजय मिळविला असून स्थानिक आघाडी आणि अपक्ष शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने येथे शिवसेनेचीच सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयानंतर शिवसैनिकांनी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत भगवा जल्लोष केला. तर नाशिक, नागपूर, पुण्यासह उर्वरित महानगरपालिकांमध्ये भाजपला कौल मिळाला आहे.

 ईश्वरी चिठ्ठीचा कौल भाजपला; बागलकरांचा विजय थोडक्यात हुकला

शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर २२० मतदारसंघातून सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अगदी बाराव्या फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायम असताना तेराव्या फेरीत सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहा यांना अधिक मते पडल्याचे घोषित करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा आकडय़ांची जुळवाजुळव करण्यात आली असता दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. तब्बल साडेपाच तास फेरमतमोजणी करण्यात आल्यानंतरही ही समसमान मते कायम राहिल्याने अखेर पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाचारण करीत चिठ्ठी टाकण्याचा पर्याय निवडण्यात आला. यावेळी इशिका साळुंके या लहान मुलीने काढलेल्या ईश्वरी चिठ्ठीचा कौल अतुल शहा यांच्या बाजूने लागल्याने त्यांना विजयाची लॉटरीच लागली. मात्र बागलकरांचा विजय थोडक्यात हुकला.

 कामांना दिलेली साथ

राज्यभरात भाजपला मिळालेल्या  यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. हे यश म्हणजे महाराष्ट्राने भाजपने केलेल्या कामाला दिलेली साथ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखवलेला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. निवडणुकीत चांगली कामगिरी झाली नाही म्हणून राजीनामा स्वीकारणे योग्य नाही असे सांगत पंकजा मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

आता कटुता पुरे झाली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये आलेली कटुता आता पुरे झाली, असे सांगत हे दोघे एकत्र येणार नाहीत तर काय काँग्रेससोबत एकत्र येणार का, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना आणि भाजपमधील समन्वयाचे काम आवडीने करेन असेही ते म्हणाले.

 निवडणुकीत झाले गेले विसरायचे असते

निवडणुकीत जे झाले ते विसरून जायचे असते, असे ज्येष्ठ भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालानंतर बोलताना सांगितले. मुंबईत शिवसेना -भाजप यांच्यात झालेल्या ‘तू तू मैं मैं’वर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अशी सामंजस्याची भूमिका मांडली.

राष्ट्रवादीचे अपयश, अमिताभचे चित्रपटही पडतात

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अपयशाबद्दल बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘अमिताभचे चित्रपटही पडतात’ अशी प्रतिक्रिया दिली. या अपयशातून आम्ही निश्चित बाहेर येऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमिताभचे चित्रपटही पडतात; मात्र यामुळे अमिताभचे मोठेपण कमी होत नाही. ते महान कलाकार आहेत आणि राहणार ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. निवडणुकीतील एखाद्या अपयशाने आम्ही खचून जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निकालावर आम्ही आत्मचिंतन करू आणि संघटनेची नव्याने बांधणी करू, असेही त्या म्हणाल्या.