नालेसफाईतील घोटाळेबाज कंत्राटदारांना आणण्याचा डाव फसला

सामना ऑनलाईन,मुंबई
नालेसफाईच्या कामात गाळ खाल्लेल्या व नंतर काळय़ा यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांनाच पुन्हा वेगळय़ा मार्गाने कंत्राट देण्याचा प्रशासनाला डाव आज स्थायी समितीच्या सतर्कतेमुळे फसला. कचरा वाहून नेण्याचे कंत्राट देण्यासाठी प्रशासनाने मांडलेल्या प्रस्तावात सातही कंत्राटदार काळय़ा यादीतील असल्याचे समोर आले. सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रस्ताव दफ्तरी दाखल केला.

गोराई कचरा हस्तांतरण केंद्र येथून मुलुंड व देवनार व कांजूर डंपिंग ग्राऊंडवर कचरा वाहून नेण्यासाठीचा ७ कोटी ९५ लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता, मात्र यात कंत्राट देण्यात येणाऱया सातपैकी सहा कंत्राटदारांचा पत्ता एकच मात्र नावे बदलली होती. हे कंत्राटदार २०१६ साली नालेसफाई कामांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले असल्याचे सदस्यांच्या लक्षात आल्यावर या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात आला.

काळय़ा यादीतील कंत्राटदारांना थारा नाही; शिवसेनेची भूमिका

काळय़ा यादीतील कंत्राटदारांना शिवसेना थारा देणार नाही, असे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. काळय़ा यादीतील कंत्राटदारांना पालिकेची दारे खुली करू नयेत असे सांगत शिवसेनेनेही प्रस्तावाला विरोध केला. अखेर सर्वपक्षीय विरोधामुळे प्रस्ताव दप्तरी दाखल दाखल करण्यात आला.