शेतकऱ्यांशी बोलायला सरकार कमी पडतेय, उद्धव ठाकरे यांचा तडाखा

फोटो सौजन्य-राजेश वराडकर

सामना ऑनलाईन, मुंबई

नागपूर समृद्धी मार्ग वळवण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे, पण शेतकऱयांची सुपीक जमीन सरकारच्या डोळ्यात का सलते या प्रश्नाचे उत्तर द्यायला सरकारचा कुणी प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे जात नाही ही त्यांची व्यथा आहे. ज्यांची जमीन प्रकल्पात जाणार आहे त्यांच्याशी बोलायला, संवाद साधायला सरकार कमी पडतेय, असा जोरदार तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.

नागपूर समृद्धी एक्प्रेस-वेमध्ये कोपरगाव, नगर आणि शिर्डीमधील दहा गावांतील शेतकऱयांच्या बागायती जमिनी जाणार आहेत. आज या शेतकऱयांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

विकास सर्वांनाच हवा आहे, पण एखाद्याला भिकेला लावून केलेला विकास कोणीच स्वीकारणार नाही असे बजावून उद्धव ठाकरे म्हणाले, विकास होताना शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्या प्रकल्पात जाऊ नये हीच आमची भूमिका आहे. जमिनीची पाहणी करताना, नोंदणी करताना त्याची काळजी अधिकाऱयांनी घेतली पाहिजे. जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. पंतप्रधानांनी दणादण उद्घाटनाचे, भूमिपूजनाचे कार्यक्रम केले, पण पुण्यातील मेट्रोला हरित लवादाने स्थगिती दिली. यामुळे विनाकारण बदनामी होते याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे आदी उपस्थित हाते.

युतीबद्दल काय म्हणाले…

उद्या-परवा निवडणूक आयोग युतीची नव्हे, तर निवडणुकीची घोषणा करील. निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीत. आमची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगायलाच लागेल, नाहीतर निवडणुका होऊन जातील. सगळ्याचे अंतिम उत्तर लवकरच देऊ.