लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही चालू देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले

सामना ऑनलाईन । मुंबई

अंगणवाडी सेविकांनी मानधनवाढीसाठी पुकारलेला संप मोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोकशाहीच्या नावाखाली कुणी ठोकशाही करू पाहात असेल तर त्यांच्या लाठ्या-काठ्या तोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील फडणवीस सरकारवर कडाडले. अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या धमक्यांनी खचून न जाता हा संघर्ष चालू ठेवला पाहिजे, या संघर्षात शिवसेना तुमच्या सोबत आहेच, असा विश्वासही त्यांनी वेळी दाखवला आहे. (फोटोगॅलरी)

मानधनवाढीसाठी ११ सप्टेंबरपासून दोन लाखांवर अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे जातीने उपस्थित राहिले. त्यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली आणि सरकारवर सडकून टीका करतानाच सेविकांना आत्मविश्वासही दिला. तुम्ही लाखो मुलांच्या आरोग्याची काळजी घेता, तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या माता आहात. तेव्हा तुम्हाला योग्य ते मानधन मिळालच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार तुमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तुम्ही ठाम राहा. खचून जाऊ नका. खचला तो संपला. होय, मी सरकारला नमवू शकते हा आत्मविश्वास तुमच्या मनात कायम ठेवा. कारण आज आणि आता नाही केलं तर पुन्हा कधी मिळणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात कुपोषणाचा गंभीर प्रश्न आहे. सरकार झोपलेले असले तरी शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री मात्र झोपलेले नाहीत. आमची मनं मेलेली नाहीत, म्हणून आज मी तुमच्या सोबत येथे आलो आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेना ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.

भाजपला मातांचे शाप भोवल्याशिवाय राहणार नाही!

या सरकारला फक्त निवडणुकी पुरता शिवाजी महाराज आठवतात. मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील स्त्रियांचा सन्मान ठेवला होता. त्यांची काळजी घेतली होती, तसा आदर्श हे सरकार ठेवताना दिसत नाही. उत्तर प्रदेशात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यानं बालकांचा मृत्यू झाला. हे पाप कुणाचं? अंगणवाडीत जी मुलं येतात त्यांची स्थितीही फार चांगली नाही, अनेक बालकं आणि त्यांच्या माताही कुपोषित असतात. त्यावेळी त्या मुलांना सांभाळण्याचं काम तुम्ही भगिनी करतात. तुम्ही त्यांच्या मातांप्रमाणे काळजी घेतात. असे असूनही तुम्हाला मानधन वाढवून मिळणार नसेल तर या मातांचे शाप या सरकारला लागतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

या मातांचं सौभाग्य कोण टिकवणार?

राज्यात अंगणवाडी सेविका फक्त पाच हजार रुपये मानधनावर काम करीत आहेत. तर सहाय्यकांना तीन हजार पाचशे तर मदतनीसांना केवळ अडीच हजार रुपये मानधन दिले जात आहे. या तुटपुंज्या वेतनात घर चालवणे मुश्कील झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यांच्या चुली विझल्या तर काय करणार? त्यांचं सौभाग्य कसं टिकवणार? फक्त वीज वाटण्याच्या बाता करून सौभाग्य टिकणार नाही, खरं सौभाग्य टिकवण्यासाठी काही करा, असा संतप्त टोला त्यांनी लगावला.

पाहा उद्धव ठाकरे यांचे धगधते भाषण: