शिवसेना जून २०१७ पर्यंतची कर्जमुक्ती करून घेणारच!

सामना प्रतिनिधी । नांदेड / हिंगोली / परभणी

राज्यातील 40 लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा करणार असा दावा सरकार करत आहे. पण त्याआधीच सरकारने निकषांच्या चाली खेळणे सुरू केले आहे. शेतकऱयाला सरकारी चालीत फसवू नका. त्याचा सातबारा कोरा करा अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला ठणकावले. मराठवाडय़ातील नांदेड, वसमत, परभणी, रामनगर येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. कर्जमाफीच्या निर्णयातील जून 2016 ही अट आम्हाला मान्य नाही. सरकारला निकष बदलायला शिवसेना भाग पाडेल आणि जून 2017 पर्यंतची कर्जमुक्ती देण्याची शेतकऱयांची मागणी मंजूर करून घेईलच अशी ग्वाही त्यांनी शेतकऱयांना दिली. नांदेडपासून संभाजीनगरपर्यंत मराठवाडय़ात ठिकठिकाणी शेतकऱयांनी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत करत कर्जमाफीच्या लढय़ाबद्दल त्यांचे आभार मानले.

कर्जमाफीसाठी शेतकऱयांसोबतच शिवसेनेने जबरदस्त लढा दिल्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. राज्यातील 40 लाख शेतकऱयांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरले. शेतकऱयांना कर्जमाफी मिळाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक, नगर आणि संभाजीनगरचा दौरा केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाडय़ाचा झंझावाती दौरा करत नांदेड, वसमत, परभणी आणि जालना जिह्यातील शेतकऱयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षात असताना आणि आता सत्तेत असतानाही शिवसेना रस्त्यावरच आहे. आमचे नाते शेतकरी आणि सामान्य माणसाशी आहे. ते आम्ही कदापि तुटू देणार नाही. 10 वर्षांपूर्वीही शेतकऱयांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी शिवसेनेने मेळावे घेतले. आंदोलने केली. त्यानंतर केंद्र सरकारला कर्जमाफी करावी लागली, पण शेतकऱयांना फायदा झाला नाही. आज 10 वर्षांनंतर पुन्हा शेतकऱयांचा सातबारा कोरा करा, शेतकऱयांना कर्जमुक्त करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आणि सरकारला मागणी मान्य करायला भागही पाडले. कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर आता अनेकजण त्याचे श्रेय घेत आहेत. पण मी मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी बाहेर पडलो नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी एसी बसमधून शेतकऱयांसाठी संघर्ष यात्रा काढली, पण त्यांना यात्रा काढून जे जमले नाही ते शिवसेनेने करून दाखवले अशी चपराकही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावली.

आता रडू नका

सरकारने कर्जमाफीचा जो अध्यादेश काढला त्यातील अटी आणि निकष भयंकर आहेत. आता शिवसेनेची जबाबदारी वाढली आहे. 40 लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा होतो का हे पाहावे लागेल. 40 लाख सातबारे मोजून घ्यावे लागतील. 89 लाख शेतकऱयांना खरेच कर्जमाफीचा लाभ मिळाला का हेही बघावे लागेल. 30 जून 2016 पर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे, पण शेतकऱयांना जून 2017 पर्यंतची कर्जमाफी मिळवून द्यायची आहे. ती मिळवून देईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी सुस्पष्ट ग्वाहीच त्यांनी मराठवाडय़ातील शेतकऱयांना दिली. आता माझ्या शेतकऱयांना कर्जमुक्त करताना रडू नका, शेतकऱयाचा सातबारा कोरा करा, सरकारी चालीत त्यांना फसवू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

कर्जमाफी तात्पुरता उपाय

शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी हा कायमचा उपाय होऊ शकत नाही. हा तात्पुरता उपाय आहे. शेतकऱयांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत. शेतकऱयांना आंदोलन करण्याची हौस नाही. ते काही दरोडेखोर नाहीत. नियमांची आडकाठी न आणता कर्जमुक्ती कशी करायची याची जबाबदारी आता सरकारला स्वीकारावीच लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कर्तव्य म्हणून फिरतोय

कर्जमुक्तीची घोषणा झाल्यानंतर खरे काम आता सुरू झाले आहे. कर्जमुक्तीचा उदो उदो करायला मी फिरत नाही. शेतकऱयांना याचा किती लाभ मिळतो हे पाहणे माझे कर्तव्य आहे म्हणून मी फिरतोय. कर्जमुक्तीची नीट अंमलबजावणी व्हावी याची जबाबदारी सगळय़ांवर आहे. बँकांनी कर्ज दिल्यानंतर वसुलीसाठी निर्दयीपणे नोटिसा दिल्या. शेतकऱयांची अब्रू गेली. अनेकांनी मरणाला कवटाळले. कुणी शेतकऱयांना वंचित ठेवत असेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत सांगावे लागेल असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

शेतकऱयांचे समाधान झाल्याशिवाय समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही!

जालना

समृद्धी महामार्गासाठी शेतकऱयांच्या आयुष्यात समृद्धी आणणाऱया बागा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. तथापि शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही. शेतकऱयांचे समाधान झाल्याशिवाय आणि त्यांना संपूर्ण न्याय मिळाल्याशिवाय समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामनगर येथील सभेत निक्षून सांगितले.

तुमचे मन ऐकायला आलोय!

रेडिओवर मन की बात ऐकता का, असा सवाल शेतकऱयांना करून उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमची बात ऐकायला कोणी तयार नाही. तुम्हाला किंमत नाही. शेतकऱयांचे मन, त्यांची अवस्था काय आहे हे जाऊन पाहणारा नेता आम्हाला पाहिजे. मी मात्र तुमचे मन ऐकायला आलोय आणि तुमच्या मनाप्रमाणेच निर्णय झाले पाहिजेत.

…शिवसेनेचा वाघ आला

कर्जमाफीच्या यशस्वी लढय़ानंतर शेतकऱयांशी संवाद साधण्यासाठी मराठवाडय़ात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गावागावांतील शेतकऱयांनी जोरदार स्वागत करून त्यांचे आभार मानले. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि संभाजीनगर जिह्यांत ठिकठिकाणी शेतकरी उद्धव ठाकरे यांची वाट बघत रस्त्यावर उभे होते. जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणांनी शिवसैनिक व शेतकरी परिसर दणाणून सोडत होते. फटाक्यांच्या आतषबाजीबरोबरच अनेक ठिकाणी फुलांची उधळणही होत होती. वसमतची सभा आटोपून परभणीकडे जात असताना एरंडेश्वर आणि परभणी नाका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. परभणीहून निघाल्यानंतर कोल्हा पाटी आणि सेलू फाटा येथे रस्त्यावर वाट पाहत थांबलेल्या शेतकऱयांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.

मंठा गावातही शेतकऱयांनी उद्धव ठाकरे यांची विश्रामगृहात भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. रामनगर येथील सभा आटोपून संभाजीनगरकडे निघाले असता बदनापूर येथे शेतकऱयांनी उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. संभाजीनगर जिह्यात प्रवेश करताच शेकटा, करमाड, गोळेगाव, शेंद्रा, चिकलठाणा या ठिकाणीही शेतकऱयांनी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले.

नेते, पदाधिकाऱयांची उपस्थिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते-खासदार चंद्रकांत खैरे, लक्ष्मण वडले, नांदेडचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, आमदार हेमंत पाटील, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सत्कारासाठी तरोडा येथे शिवसेना पदाधिकाऱयांनी गुलाबपुष्पांचा हार आणला होता. उद्धव ठाकरे यांनी तो हार न स्वीकारता संवादासाठी आलेल्या पाच ज्येष्ठ शेतकऱयांच्या गळय़ात घातला आणि वडीलधाऱया शेतकऱयांचे आशीर्वाद घेतले.