शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनासाठी ५० लाखांची तरतूद

देशभरातून येणार्‍या शिवसैनिकांसाठी पालिका करणार तयारी

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबरला देशभरातून स्मृतीस्थळावर येणार्‍यांना यावर्षी पालिकेच्यावतीने सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. त्याकरीता पालिका ५० लाख रुपये खर्च करणार असून पुढील वर्षापासून अर्थसंकल्पातच त्याकरीता तरतूद केली जाणार आहे. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज या संदर्भात पालिका प्रशासन आणि पोलीस व अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

येत्या १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांचा पाचवा स्मृतीदिन आहे. यादिवशी देशभरातून शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती स्मृती स्थळावर वंदन करण्यासाठी येत असतात. आदल्या दिवसापासूच देशाच्या कानाकोपर्‍यातून श्रद्धेने नागरिक येतात आणि रांगा लावून स्मृतीस्थळाचे दर्शन घेतात. स्मृतीदिनी येणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी यावर्षीपासून पालिकेतर्पेâ विविध सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत. महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज पालिका मुख्यालयात या अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्यासह अग्निशामक दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे, पोलिस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त (वाहतूक) उपस्थित होते. तसेच घनकचरा, आरोग्य, अशा विविध संबंधित विभागांचे उपायुक्तही यावेळी उपस्थित होते.

पुढील वर्षीपासून अर्थसंकल्पातच तरतूद

स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्कवर येणार्‍यांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे पालिकेने विविध सेवासुविधा पुरवाव्या, अशी मागणी या बैठकीत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. या तयारीसाठी पालिकेतर्फे यावर्षी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तर पुढील वर्षापासून अर्थसंकल्पातच तरतूद केली जाईल, असे आश्वासन यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याची माहिती सभागृह नेत्यांनी दिली.

> या सोयीसुविधा देणार
दोन हजार चौ. मीटरचा विसावा मंडप
आरोग्य केंद्र
पिण्याच्या पाण्याची सोय
व्हीआयपींसाठी मंडप
रांगेत उभे राहणार्‍यांसाठी शेड
अग्निशामक दलाची यंत्रणा, रुग्णवाहिका,
मैदानाची साफसफाई, गार्डनिंग, लॅण्डस्केपिंग याचीही जबाबदारी पालिका घेणार आहे.