बंद ट्रान्सफॉर्मर्स तातडीने सुरू करा

सामना ऑनलाईन । नाशिक

आधीच अस्मानी संकटांमुळे शेतकरी हवालदिल असताना महावितरणने थकीत वीजबिलामुळे ट्रान्सफॉर्मर्स बंद करण्याचा सपाटा लावला आहे, हे बंद ट्रान्सफॉर्मर्स तातडीने सुरू करावेत, पावसाळ्यात विहिरीवरील मोटार सुरू केलेल्या नसतानाही पाठविलेली भरमसाट बिले कमी करा, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत द्या, आदी मागण्यांसाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणवर धडक दिली.

नाशिक तालुक्यातील एकलहरे, सामनगाव, हिंगणवेढे, कोटमगाव, सय्यद पिंप्री येथील खंडीत वीजपुरवठय़ामुळे हैराण झालेल्या शेतकऱयांनी खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली, महावितरणच्या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी केल्या. याची दखल घेत गोडसे यांनी शेतकऱयांसह महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांची भेट घेवून चर्चा केली. एकलहरे, सामनगाव, हिंगणवेढे, कोटमगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा, बंद ट्रान्सफॉर्मर्स सुरू करावेत, पावसाळ्यातील तीन महिने शेतकऱ्यांनी विहिरीवरील मोटार सुरू केल्या नाहीत, तरीही भरमसाठ वीजबिले पाठविण्यात आली, ती कमी करावी, या मागण्या करण्यात आल्या.

या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक गावात शिबीर घेवून संवाद साधला जाईल, असे कुमठेकर यावेळी म्हणाले. याप्रसंगी नगरसेवक रमेश धोंगडे, सामनगावचे सरपंच सचिन जगताप, माजी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, शशीकांत ढिकले, हेमंत ढिकले, नितीन जगताप, चंद्रशेखर जगताप, दौलत जगताप, नंदू वराडे, आनंदा ढिकले, रघुनाथ सैंदाणकर आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.