शिवसेनेच्या डरकाळीने महाराष्ट्र दणाणला!

पुण्यात शिवसेनेचं कर्जमुक्तीसाठी आंदोलन

सामना प्रतिनिधी । मुंबई

कर्जमुक्ती होत कशी नाही, झालीच पाहिजे! दसऱ्यापूर्वी शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे! अशा गगनभेदी घोषणांनी सोमवारी महाराष्ट्र दणाणून गेला. दसऱ्यापूर्वी राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्हय़ाच्या जिल्हाधिकाऱयांना या मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आले, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

शिवसेनेच्या रेटय़ामुळे राज्यातील फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर केली. तीन महिने उलटून गेले तरी राज्य सरकार अजून कर्जमाफीचा अभ्यास करण्यातच गर्क आहे. आकडय़ांचे खेळ आणि तारखांवर तारखा सरकारकडून देण्यात येत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेने बँकांसमोर ढोल वाजवले.

आज आंदोलनाच्या तिसऱया टप्प्यात राज्यभरात शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी रस्त्यावर उतरून एल्गार केला.