नाशिकमध्ये शिवसेनेने घातले नोटाबंदीचे श्राद्ध

सामना ऑनलाईन । नाशिक

नोटबंदीच्या निर्णयाला काल एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली. सर्वच क्षेत्रात मंदीचे मोठे सावट आले. सामान्य जनतेला या निर्णयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा जोरदार निषेध करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीरामकुंडावर नोटाबंदीचे विधिवत प्रथम वर्षश्राद्ध घातले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. नोटबंदीच्या निर्णयाने देशाचे व सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले. शेतकऱयांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला. सहकारी बँका अडचणीत आल्या. उद्योगधंदे ठप्प होवून अर्थव्यवस्थाच मोडकळीस आली, याचा निषेध करीत मोठय़ा संख्येने शिवसैनिक नाशिकच्या श्रीरामकुंड येथे सकाळीच दाखल झाले. तेथे नोटाबंदीचे प्रथम वर्षश्राद्ध असा मोठा फलक लावण्यात आला होता. नोटबंदीने दहशतवाद संपला का? काळा पैसा बाहेर आला का? जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले का? भ्रष्टाचार संपला का? नवीन नोकऱया, उद्योगधंदे आले का? शेतकरी आत्महत्या थांबल्या का? जनधन खात्यात प्रत्येकी पंधरा लाख रुपये जमा झाले का? आदी प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आले. या फलकाजवळ पाचशे व हजार रुपयांच्या बंद करण्यात आलेल्या प्रतिकात्मक नोटांना हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या नोटांचे पिंडदान करून विधीवत श्राद्ध घालण्यात आले.

शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रकांत लवटे, प्रवीण तिदमे, रमेश धोंगडे, संतोष गायकवाड, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, पूनम मोगरे, देवानंद बिरारी, योगेश बेलदार, देवा जाधव, पप्पू टिळे, अजीम सय्यद, मामा ठाकरे, शिवाजी भोर, श्यामला दीक्षित, दिगंबर मोगरे, नितीन चिडे, सुनील पाटील, योगेश चव्हाणके, मंदाकिनी दातीर, आदित्य बोरस्ते, दीपक दातीर, उमेश चव्हाण, सुभाष गायधनी, नाना पाटील, दादाजी आहिरे, रवींद्र जाधव, वैभव ठाकरे, रमेश उघडे, राजेंद्र नानकर, संजय परदेशी, आशीष साबळे, प्रवीण मराठे, अनिल साळुंखे, विशाल कदम, सतिश खैरनार, अमोल सूर्यवंशी, श्याम कंगले, शंकर पांगारे, प्रशांत काळे, सतिश काळे, गणेश बर्वे, आनंद फरताळे, प्रशांत दैतकार-पाटील, अजित काकडे, प्रताप मटाले, दीपक आरोटे, राजू देशमुख यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

मुंडण करून काँग्रेसने केला निषेध

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाने काळा दिवस पाळून निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयास एक वर्ष पूर्ण झाले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱयांना प्रचंड हाल सोसावे लागले. नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँगेसने घातले नोटाबंदीचे श्राद्ध
नोटाबंदीच्या काळात सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काहीही साध्य झालेले नाही. उलट काळा पैसा पांढरा झाला असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातले.