वसई-विरारकरांना हक्काचे पाणी द्या! शिवसेनेची एमएमआरडीए कार्यालयावर धडक

वसई-विरारकरांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, सूर्या पाणीपुरवठा योजना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा देत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयावर धडक दिली.   तसेच काशिद-कोपरा येथून तत्काळ 70-80 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला.

वसई-विरार महानगरपालिकेची लोकसंख्या 24 लाखांच्या घरात असून त्यांची पाण्याची मागणी 372 दशलक्ष लिटर एवढी आहे. पालिकेला सध्या वेगवेगळ्या स्त्राsतांमधून 230 दशलक्ष लिटर पाणी मिळत असून 142 दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पालिकेला एमएमआरडीएच्या माध्यमातून सूर्या पाणीपुरवठा योजनेतून 185 दशलक्ष लिटर पाणी मिळणार असून त्याची अनेक कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत. दरम्यान आतापर्यंत पूर्ण झालेल्या जलवाहिनीच्या कामानुसार पालिकेला 70-80 दशलक्ष लिटर पाणी जुलैअखेर मिळणे आवश्यक होते. तरीही एमएमआरडीएकडून ते उपलब्ध करून देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एसएमआरडीएवर धडक देत अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांना जाब विचारला. त्यामुळे टरकलेल्या प्रशासनाने सदरचे काम पूर्ण झाले असून टेस्टिंगची कामे बाकी आहेत, ती पूर्ण झाल्यानंतर तातडीने काशिद-कोपर येथून पाणीपुरवठा केला जाईल असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा संघटिका किरण चेंदवणकर, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

उद्घाटनासाठी न थांबता पाणीपुरवठा सुरू करा!

वसई-विरारकरांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 185 एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर केले होते. एमएमआरडीएने सदरचे काम चार महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे. पण केवळ उद्घाटनाच्या कारणास्तव पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे ही बाब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून दिली. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्घाटनासाठी न थांबता पाणीपुरवठा सुरू करण्याची कार्यवाही करावी, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करत त्याबाबतचे पत्र एमएमआरडीएला दिले आहे.