दक्षिण-मध्य मुंबईत महायुतीचा धडाका; राहुल शेवाळे विजयी

121

सामना ऑनलाईन । मुंबई

काँग्रेसने पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या लढाईच्या आधीच म्यान केलेली हत्यारे, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळय़ा, विद्यामान खासदार म्हणून केलेली जनहिताची कामे, शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचा तडाखेबंद प्रचार व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव यामुळे दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी न करण्याची या मतदारसंघातील परांपरा मोडीत काढत शेवाळे यांनी तब्बल 1 लाख 52 हजारांहून अधिक दणदणीत मताधिक्य घेत काँग्रेसप्रणीत महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना धूळ चारली.

विजयाची कारणे
धारावीच्या पुनर्विकासाचा सतत केलेला पाठपुरावा, गावठाणे व कोळीवाडय़ांच्या विकासाच्या सीमांकनाची कामे, एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचे ‘प्रभादेवी’ रेल्वे स्थानक केलेले नामकरण, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी घेतलेला पुढाकार, महाराष्ट्र नगर, चिता कॅम्प, घाटला व्हिलेज, सिद्धार्थ नगर अशा झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन व दादर चौपाटीचे रखडलेले मार्गी लावलेले सुशोभीकरण शेवाळे यांच्या पथ्यावर पडले.

हा विजय मी शिवसेनाप्रमुखांना समर्पित करतो. हा विजय मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा आहे. मागील पाच वर्षांत केंद्र, राज्य व महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे मतदारांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. पुढील पाच वर्षांत या मतदारसंघाला ‘स्मार्ट’ करण्याचा माझा मानस आहे.
– राहुल शेवाळे, खासदार

आपली प्रतिक्रिया द्या