हिंगोलीत रविवारी गद्दारांना गाडण्यासाठी शिवसेनेची निर्धार सभा; उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन

स्थळ : रामलीला मैदान
वेळ : दुपारी २ वाजता

गद्दारांना गाडण्यासाठी रविवारी 27 ऑगस्ट रोजी हिंगोलीत शिवसेनेची निर्धार सभा होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या सभेत प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. रामलीला मैदानावर दुपारी 2 वाजता होणार्‍या या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंगार या भूमीत 1985 मध्येच पेरला गेला. शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्यानंतर हिंदुत्वाच्या विचारांचा वणवाच पेटला. गाव तिथे शाखा सुरू झाल्या. हिंगोलीने विधानसभा, लोकसभेवर शिवसेनेचे शिलेदार पाठवले. दुर्देवाने निष्ठेला गद्दारीची दृष्ट लागली. हीच गद्दारीची विषवल्ली कायमची उखडून फेकण्यासाठी शिवसेनेचा महाएल्गार रामलीला मैदानावर होणार आहे.

रविवारी होणार्‍या निर्धार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी हिंगोलीसह संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला आहे. रामलीला मैदानावर उसळणारे गर्दीचे तुफान पाहता वाहतूक तसेच पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सभा भर दुपारी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची जागोजाग व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, जिल्हासंघटक बाळासाहेब मगर, माजी आमदार संतोष टारफे, युवा सेनेचे शिवा शिंदे, कन्हैया बाहेती, गणेश शिंदे आदींच्या नेतृत्वाखाली सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

सभेचा टीझर आला…
‘शिवसेना संपवण्यासाठी चोहोबाजूने गारदी तुटुन पडत आहेत. पण याच लढाईची आम्ही वाट बघत होतो. एक तर कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, जर कुणी वार केला तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचे नाही…’ हिंगोली येथे रविवारी होणार्‍या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिला टीझर आला आहे. लाखो जनसमुदायाला उद्देशून उद्धव ठाकरे हे गद्दारांवर प्रहार करताना दिसत आहेत.