शिवसेनेचा दणका, बँकासह पोस्‍टातही आधार नोंदणी केंद्राची सुरवात

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगावात एकाच ठिकाणी आधार नोंदणी केंद्र असल्‍याने अनेकांचा खोळंबा होत आहे. या कामी बँकाकडून चालढकल व टोलवाटोलवी होत आहे. याचा अनुभव शिवसेना शहरप्रमुख अस्‍लम शेख यांना आल्‍याने त्‍यांनी याबाबत तहसिलदार शिवाजी सुसरे यांच्‍याकडे आधार नोंदणी केंद्र कुठे कुठे आहेत ? याची विचारणा केली. त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जिथे आधार नोंदणी केंद्रं आहेत तिथे संबंधित कर्मचाऱ्यांना लोकांच्या अडचणी दूर करा आणि आधार नोंदणीची कामे जलदगतीने करा अशी विनंती केली होती. शेख यांनी निवेदनाचे पत्र देताच नायब तहसिलदार शिवाजी सुसरे यांनी बँका व पोस्‍टात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधारचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. शिवसेनेचा दणक्यामुळे बँकासह पोस्‍टातही आधार नोंदणी केंद्रातील कासवगतीने सुरू असलेली कामे आता वेगाने व्हायला लागली आहेत.

देशभरातील बँकांना आपल्या एकूण शाखांपैकी १० टक्के शाखांमध्ये आधार नोंदणी केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. बँकांनी आधार केंद्र सुरू न केल्यास प्रत्येक शाखेला २० हजार रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात येणार आहे. या आधार केंद्रांचा फायदा नागरिकांना होणार असून, त्यामुळे सध्याच्या आधार केंद्रांवर आधार नोंदणीसाठी तासन् तास रांगा लावणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित झाल्यास नागरिकांना नव्याने आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये बदल करून घेणे सुलभ होईल.