राजकीय अस्थिरता वाढू नये म्हणून शिवसेना सत्तेत! – संजय राऊत

सामना प्रतिनिधी । पुणे

सत्तेत असूनही जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने केले आहे. सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेत नाराजी आहे. मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढलो त्यांच्या हातात राज्य कसे द्यायचे? राज्यातील राजकीय अस्थिरता वाढू नये म्हणून शिवसेना सत्तेत आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपबरोबरच विरोधी पक्षांचा समाचार घेतला. संपर्कप्रमुख उदय सामंत या वेळी उपस्थित होते.

शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत, यावरून विरोधी पक्ष सातत्याने शिवसेनेवर टीका करतात, असा प्रश्न विचारला असता, सध्या सरकारविरोधात जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. मात्र महाराष्ट्रातील अस्थिरता वाढू नये म्हणून शिवसेना सत्तेत आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात लढलो त्यांच्या हातात राज्य कसे द्यायचे, अशी सडेतोड भूमिका त्यांनी मांडली. सरकारविरोधी नाराजी निर्माण करण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले नाही. सत्तेत असूनही जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम आम्ही केले. महागाई, बेरोजगारी, बुलेट ट्रेन आणि कश्मीरसारख्या मुद्दय़ांवरून आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मध्यांतरानंतरचा सिनेमा सुरू झालाय, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना सर्व प्रकारच्या लढाईसाठी सज्ज
विधानसभा, लोकसभा निवडणुका कधी लागतील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगू शकतील. त्याचीच तयारी म्हणून जिल्हा व शहरातील विधानसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. शिवसेनेत अतिशय आशादायक व सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेना सर्व प्रकारच्या लढाईसाठी सज्ज असून लवकरच शिवसैनिक नव्या स्वरुपात दिसेल असे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पवार राजकारणाचे होकायंत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवकरच निवडणुका होणार आहेत, असे भाकीत केले आहे. त्यावर बोलताना, पवार हे राजकारणाचे होकायंत्र आहेत. त्यामुळेच सर्व गोष्टी त्यांना लवकर कळतात, असे स्पष्ट करत ‘पवार’ हे मोदींचे राजकीय गुरू असल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. दरम्यान, पवार हे काही जणांसाठी धोकायंत्र असल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प, प्रिन्स चार्ल्स भाजपच्या संपर्कात
अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे भाजपचे नेते नेहमीच सांगतात, यावर डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स चार्ल्स भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. अरब राष्ट्रातील काही राजांबरोबर हाफीस सईदही भाजपच्या संपर्कात आहे. कदाचित अण्णा हजारेही त्यांच्या पक्षात येणार असतील, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपच्या इनकमिंगची खिल्ली उडवली.

बुलेट ट्रनेचे रूळ उखडण्याची धमक शिवसेनेत
बुलेट ट्रेनवर पहिला दगड शिवसेनेने मारला. आता अनेकांची मनगटे शिवशिवताहेत. बुलेट ट्रेनला पहिल्या दिवशीच शिवसेनेने विरोध केला होता. मात्र बुलेट ट्रेन रोखण्यासाठी विटा लावून जमणार नाही तर रुळ उखडावे लागतील. हे रूळ उखडण्याची धमक शिवसेनेत आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावले.

>भाजप आणि विरोधी पक्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
>निवडणुका लवकर होणार असल्याची जाणीव झाल्याने भाजपची थापा मारण्यात वाढ
>शिवसेनेचा मुद्दा हायजॅक करणारा अजून जन्माला यायचाय!
>लवकरच पुण्यात शिवसेनेचा नवीन चेहरामोहरा दिसेल
>मंत्रिमंडळ विस्ताराचे १९ मुहूर्त येऊन गेले, त्यातील तीन तर पितृपक्षातील होते.