‘व्हिजन’चे ढोल!

52

मुख्यमंत्री नागपुरात ‘व्हिजनवाद’चा नवा अर्थ समजावून सांगत असतानाच कश्मीरात लष्कराच्या काफिल्यावर भयंकर आतंकवादी हल्ला झाला व त्यात तीन जवान शहीद झाले. ‘नोटाबंदी’नंतर देशातील आतंकवाद नष्ट होईल असे ‘व्हिजन’ होते. त्या व्हिजनचे काय होत आहे ते रोजच दिसते. वा रे तुमचे विकासाचे व्हिजन! हा जो काही तुमचा व्हिजनचा ढोल आहे तो सध्यातरी तुमच्याकडेच ठेवा. निदान शिवरायांच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्राला अशा व्हिजनची गरज नाही.

मित्रवर्य भारतीय जनता पक्षाने ‘व्हिजन’च्या मुद्द्यावर अनौपचारिक बार उडवला आहे. विकासासंदर्भात आमचे व्हिजन मान्य असेल तर ‘युती’चे बोलू असे मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांत सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आता हे सर्व अनौपचारिक होते तर मग सर्वत्र प्रसिद्ध कसे झाले? व जे प्रसिद्ध झाले ते सर्व खरे आहे काय? यावर खुलासे वगैरे मागण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाचा दिल्ली व इतर राज्यांतील कारभार हा ‘व्हिजन’वादीच आहे व त्याबद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. महाराष्ट्रातील गुन्हेगारी साफ घटल्याचे मुख्यमंत्री सांगत असतानाच प्रत्यक्ष नागपुरात २० तासांत चार निर्घृण हत्या झाल्या आहेत. पण कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कमालीचे व्हिजन असल्याने ‘हत्या’ नसून या मंडळींनी शांतचित्ताने समाधी घेतली असे आता पत्रकारांनी लिहायला हवे. राज्यकर्त्या भाजपचे ‘व्हिजन’ की काय ते कसे असते पहा. मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच आजूबाजूच्या जमिनीला मोठा भाव मिळेल. त्यामुळे सरकार पक्षाशी संबंधित अनेक सनदी अधिकार्‍यांनी समृद्धी महामार्गावरील जमिनी कशा स्वस्तात लाटल्या आहेत याचे जे ‘व्हिजन’ समोर आले ते धक्कादायक आहे. मात्र या प्रकरणाला हजारो एकर जमिनीचा घोटाळा असे न म्हणता एक ‘व्हिजन’ म्हणूनच त्याकडे आपण सगळ्यांनी पाहायला हवे. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालाने जे चित्र समोर आले त्यामुळे ‘व्हिजनवादा’स टाळी मिळत आहे असे जर कुणाचे म्हणणे असेल तर
ते चुकीचे
आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जास्त संख्येने जिंकले असले तरी हे यश निर्विवाद नाही. हाती सत्ता असलेला कोणताही पक्ष छोट्या निवडणुकांत अशी सरशी करीत असतो. स्वत: राज्याचे मुख्यमंत्रीच प्रचारात उतरल्यावर सरकारी यंत्रणा हवी तशी हलवता येते व घोषणांच्या उसळत्या लाटांचे तडाखे मतदानात बसतात. या निवडणुकीत जुन्या नोटांचा वापर करून मतदारांची करमुक्ती केली गेली असाही एक आरोप निकालानंतर त्यावेळी झाला होता. मात्र हा भ्रष्टाचार नव्हता तर विकासाचे मस्त व्हिजन होते असेच समजून घ्यावे लागेल. फक्त तो इतरांनी केला असता तर भ्रष्टाचार किंवा काळ्या पैशांचा वापर ठरला असता. पुन्हा भाजपच्या निवडणूक विजयाचे व्हिजन कसे ते प्रांताध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच आता दिलदारीने सांगितले आहे. ‘मतदारांनो, मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ‘लक्ष्मी’ तुमच्या घरी आली तर तिचे स्वागत करा’ असा व्हिजनवादी संदेश देऊन यशाचा मार्ग दानव्यांनी दाखवला. खरे तर या सर्व व्हिजनवादी बाता जेथून होतात त्या मंत्रालयातील इतर खाती कासवगतीने चालली आहेत आणि ‘क्लीन चिट’ देण्याचे खाते मात्र रेसच्या अरबी घोड्याप्रमाणे धावते आहे. हे झाले राज्यातील व्हिजनवादाबद्दल. केंद्रातील कारभाराबद्दल काय बोलायचे? तेथील भाजप सरकारचे व्हिजन राष्ट्रीय स्तरावर तर उत्तमच म्हणावे लागेल. ‘नोटाबंदी’च्या निर्णयानंतर देशात एकप्रकारे आर्थिक अराजक माजले आहे. कोट्यवधी लोकांवर बेकारीचे संकट कोसळत आहे. हेच बेकार लोक उद्या रस्त्यावर उतरून
यादवीसदृश परिस्थिती
निर्माण करतील. उत्तर प्रदेशात बँकांबाहेर गोळीबार सुरू आहे. बँकांवर आणि पोलिसांवर हल्ले वाढले आहेत व सरकारला जाब विचारणारे देशद्रोही ठरवले जात आहेत. यास ‘व्हिजन’ म्हणायचे असेल तर उत्तम कारभाराची व्याख्या तत्काळ बदलून घ्यावी लागेल. लोकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे व या कठीण परिस्थितीत देशभक्तीचा मुलामा देऊन जनभावनांची थट्टा उडवली जात आहे. कश्मीर खोर्‍यात गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक जवान मारले गेले व दहशतवादी हल्ले झाले. मुख्यमंत्री नागपुरात ‘व्हिजनवाद’चा नवा अर्थ समजावून सांगत असतानाच कश्मीरात लष्कराच्या काफिल्यावर भयंकर आतंकवादी हल्ला झाला व त्यात तीन जवान शहीद झाले. त्यात एक महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. ‘नोटाबंदी’नंतर देशातील आतंकवाद नष्ट होईल असे ‘व्हिजन’ होते. त्या व्हिजनचे काय होत आहे ते रोजच दिसते. इंफाळमध्ये दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला करून हत्यारे लुटली आहेत. जम्मू-कश्मीरात भाजपचे राज्य मेहबूबा मुफ्तीबरोबर चालले आहे व दहशतवाद्यांचा खात्मा होण्याऐवजी त्यांना बळ देणारे निर्णय रोज होत आहेत. खलीद वानीसारख्या हिजबुलच्या कमांडरला लष्कराने मारले. त्याचे दु:ख मेहबूबांना झाले व त्या दु:खात तेथील भाजप सरकार नुसते सामीलच झाले नाही तर खलीद वानीच्या कुटुंबास सरकारी अनुदान जाहीर करून विकासाचे नवे व्हिजन जाहीर केले. वा रे तुमचे विकासाचे व्हिजन! हा जो काही तुमचा व्हिजनचा ढोल आहे तो सध्यातरी तुमच्याकडेच ठेवा. निदान शिवरायांच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्राला अशा व्हिजनची गरज नाही.

आपली प्रतिक्रिया द्या