शिवसेना सदस्यांनी काढले जि.प.प्रशासनाचे वाभाडे

सामना ऑनलाईन । जळगाव

जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी हे निगरगठ्ठ झालेले आहेत. पदाधिकाऱ्यांचे सोडा ते त्यांच्याच उच्च अधिकाऱ्यांचेही ऐकत नाहीत, असे म्हणत शिवसेनेच्या सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढले. तर बुरशीयुक्त शेवायांच्या अहवालावर देखील बराच वेळ वातावरण तापले होते.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज जि.प.सभागृहात अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष नंदू महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, रजनी चव्हाण, दिलीप पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थि होते. सभेच्या सुरुवातीला इतिवृत्त वेळेवर न मिळाल्याने पुन्हा एकदा सभागृहात सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात देण्यात येणाऱ्या शिलाई मशीनसाठी यावर्षी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेनेचे जि.प.सदस्य नाना महाजन यांनी प्रशासनाला जाब विचारला. ‘ग्रामीण भागातील महिला भगिनींना शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो. दरवर्षी जिल्हा परिषदेच्यामार्फत शिलाई मशीन देण्यात येतात मात्र यावर्षी शिलाईमशीनसाठी तरतूदच करण्यात आलेली नाही, असे नाना महाजन यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यामुद्यावरुन शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंके, प्रा.डॉ. निलीमा पाटील आदी सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

बुरशीयुक्त शेवायांचा विषय पुन्हा गाजला
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे शालेय पोषण आहारात पुरवठा करण्यात आलेल्या शेवाया बुरशीयुक्त असल्याचे सदस्यांनी पुराव्यासह सादर केले होते. तेव्हा पुरवठादारावर गुन्हा दाखल करू असे आश्वासन सदस्यांना देण्यात आले होते. मात्र एवढे दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही. तर आयुक्तालयाकडे पाठविलेला अहवालावर दि. २९ ऑगस्ट रोजी आयुक्तांचे पत्र जि.प.ला प्राप्त झाले यात पुरवठा करण्यात आलेल्या शेवया ह्या खाण्यायोग्य असल्याचे सिध्द झाल्याचे सांगण्यात आले. यावरुन सभागृहात सदस्यांनी एकच गोंधळ केला. सर्वांसमक्ष शेवायांची पाकिटे दाखवली होती. तरी असे उत्तर का आले आहे असा जाब विचारण्यात आला. मात्र यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यावर शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील यांनी लहान मुलांचा शाप घेवू नका पाप लागेल, असे म्हणत संताप व्यक्त केला. शिवसेना सदस्य गोपाळ चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी केली. तर सत्ताधारी भाजपाच्या सदस्या पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, जयपाल बोदडे यांनी काय कारवाई करणार ते आताच स्पष्ट करा अशी विचारणा करत सीईओंना धारेवर धरले.