महागाई विरोधात शिवसेनेचा भंडारा, नगरमध्ये एल्गार

सामना प्रतिनिधी । भंडारा

शिवसेनेच्या वतीने आज भंडारा जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला काही तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला असून बंद पुकारण्याचे मुख्य कारण म्हणजे भंडारा जिह्यात ८ तास लोडशेडींग असल्यामुळे याचा त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत असून शेतकऱयांनासुद्धा शेतावर मोटार पम्प चालविण्याकरिता त्रास होत असून शेतकऱयांचे लावलेले धान्य पाण्याअभावी वाळत चालले आहे तरी राज्याचे ऊर्जामंत्री व भंडारा जिह्याचे सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष देऊन २४ तास वीज द्यावी तसेच महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने भंडारा जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. यावेळी वेगवेगळ्या तालुक्यात प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांनी बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, भंडारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक शेंद्रे, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचिबघले यांच्यासह शिवसैनिक बंदमध्ये सहभागी झाले होते.

नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत, पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, शेतकऱयांना तत्काळ कर्जमाफी द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सरकार गोरगरिबांची दिशाभूल करून त्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे पाप करीत असल्याचा घणाघाती आरोप केला. दरम्यान, जिल्हाधिकारी अभय महाजन यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज शिवसेनेच्या वतीने उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली नेता सुभाष चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा युवा अधिकारी विक्रम राठोड, सभापती सुवर्णा जाधव, सभागृहनेते गणेश कवडे, सभापती सारिका भूतकर यांच्यासह नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी शिवसेना उपनेते राठोड म्हणाले, दरवाढ मागे घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.