भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा बैलबंडी मोर्चा

सामना प्रतिनिधी । भंडारा

धान उत्पादक जिल्हा समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात दरवर्षी दिवाळी आधी शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसार धान्य विकता यावे यासाठी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडण्यात येतात. मात्र अद्यापही आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने; धान्य खरेदी केंद्र लवकरात लवकर उघडण्यात यावे या मागणीसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना भंडारा जिल्हाप्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहता या हंगामात सुद्धा दिवाळीपूर्वी आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक होते. मात्र या वर्षी दिवाळी लोटून सुद्धा आधारभूत धान्य खरेदी केंद्र न सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक पाहता लवकरात लवकर आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली आहे.