शिवसेनेच्या महागाईविरोधी आंदोलनाने मुंबई दणाणली!

सामना ऑनलाईन । मुंबई

महागाईने पोळलेल्या सर्वसामान्यांच्या आक्रोशाने आज अवघी मुंबई ढवळून निघाली. हा दणका शिवसेनेचा होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या दणक्याने हादरा बसला. मुंबईत ठिकठिकाणी भव्य मोर्चे निघाले. तीव्र निदर्शने झाली. महागाईच्या भस्मासुराचे पुतळे जाळले गेले. महागाईच्या राक्षसाची तिरडी काढली गेली. प्रधानमंत्री की ‘मन की बात’… बोलाचीच कढी, बोलाचाच भात…, एवढी गर्दी कशाला, सरकारच्या मयताला…अशा गगनभेदी घोषणा देत हजारो नागरिक आणि शिवसैनिकांनी महागाईचा निषेध केला. वांद्रे येथील मोर्चाचे नेतृत्व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पेट्रोल-डिझेल महागाईच्या निषेधार्थ पेट्रोल पंपाची प्रतिकृती, गॅस महाग झाल्याच्या निषेधार्थ सिलिंडरची प्रतिकृती घेऊन, पोळपाट-लाटणे वाजवत महिलांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

कंबरमोड महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांचा संताप शिवसेनेच्या या आंदोलनाद्वारे मुंबईच्या रस्त्यांवर व्यक्त झाला. सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या कानाकोपऱ्यात मोर्चे, आंदोलनांना सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनपासून मुलुंडपर्यंत, चर्चगेटपासून दहिसरपर्यंतचा परिसर या प्रचंड आंदोलनाने दणाणून गेला. हजारो शिवसैनिकांसह आबालवृद्ध नागरिक, महिला, तरुणवर्ग त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता. संतप्त महिलांनी महागाईच्या निषेधार्थ गळ्यात भाज्यांच्या माळा घालून ‘अच्छे दिन कहा है मोदीजी’ असा सवाल केला.

‘महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडणाऱया केंद्र सरकारचा निषेध असो…’ अशा जोरदार घोषणा देत शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले गेले. महानगरपालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंटजवळ झालेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी शिवसैनिकांनी मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी दुर्गामातेची वेशभूषा केलेल्या महिलेने महागाईच्या भस्मासुराच्या पोटात त्रिशूळ भोसकले. त्यानंतर त्याला चपलांनी बडवून त्याचे दहन केले गेले. यावेळी पोलिसांनी अटकाव करून पुतळा ताब्यात घेतला.

आंदोलनात सहभागी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी आणि राजकुमार बाफना, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक माई परब यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. उपविभागप्रमुख विजय सुर्वे, उपविभाग संघटक मीना दोंडकर, शाखाप्रमुख किरण बाळसराफ, संतोष शिंदे, नगरसेवक संपत ठाकूर आदींसह विभागातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.

वांद्र्यात भव्य मोर्चा

वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयापासून शिवसेनेच्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चात सहभागी झाले होते. विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार तृप्ती सावंत, आमदार रमेश लटके, महिला विभाग संघटक राजुल पटेल, रजनी मेस्त्री, जितेंद्र जानावळे, सुभाष कांता सावंत, संजय सावंत यांच्यासह सर्व उपविभागप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवा सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होते.