अभिनव सहकारी बँक निवडणूक श्री समर्थ पॅनलला शिवसेनेचा पाठिंबा

3

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

रविवार ६ मे रोजी अभिनव सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. यानिमित्त अभिनव सहकारी बँकेचे संस्थापक शंकरकाका भोईर यांच्या श्री समर्थ पॅनलला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत श्री समर्थ पॅनल विजयी होऊन बँकेला पुन्हा वैभवाचे दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

डोंबिवली व परिसरातील गोरगरीबांच्या मदतीसाठी येथील उद्योगपती शंकरकाका भोईर यांनी अभिनव सहकारी बँक स्थापन केली. या बँकेच्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून ग्राहकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली. मात्र ज्यांच्याकडे विश्वासाने बँकेची धुरा सोपवली त्यांनीच एकाधिकारशाही सुरू केल्याचा आरोप शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे.

गैरकारभाराला आळा बसणार
या अनागोंदी कारभाराला कंटाळून बँकेच्या दहा संचालकांनी राजीनामे दिले. बँक पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी स्वतः शंकरकाका भोईर हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. बँकेच्या संचालकांनी सर्व वस्तुस्थिती पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर श्री समर्थ पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सर्वसामान्य खातेदारांचे पैसे सुरक्षित राहावेत व बँकेच्या गैरकारभाराला आळा बसावा यासाठी श्री समर्थ पॅनलला निवडून देण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले आहे.