चंद्राबाबू नायडूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

11


सामना प्रतिनिधी, नवी दिल्ली

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी राजधानीत आज उपोषणाला बसलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेचे संसदीचे पक्ष नेते, खासदार संजय राऊत यांनी आंध्र भवनात जाऊन चंद्राबाबू यांची भेट घेतली. शिवसेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशा शब्दांत राऊत यांनी चंद्राबाबू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

प्रादेशिक अस्मितेच्या जपणुकीसाठी आणि त्या अस्मितेच्या गळचेपीविरोधात शिवसेना आजवर सतत लढत आली आहे, असे सांगून खासदार संजय राऊत म्हणाले की, आंध्रची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दिल्लीतून होत आहे. त्या राज्याला केंद्राने दिलेली आश्वासने पाळण्यात न आल्यामुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांची खासदार संजय राऊत यांनी भेट घेताच ती भेट आणि नायडू यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा ही देशाच्या राजधानीत ‘ब्रेकिंग न्यूज’ बनली. मोदी सरकारने आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन गेल्या पाच वर्षांत पाळले नाही. त्यामुळेच मोदींवर विश्वासघाताचा आरोप करून चंद्राबाबू नायडू हे भाजपप्रणीत एनडीएमधून बाहेर पडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या