नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजनावर शिवसेनेचा बहिष्कार, पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार

सामना प्रतिनिधी । न्हावा शेवा

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराची ऐशीतैशी करत भाजपने पुन्हा राजकारण केले आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची नावेच या निमंत्रण पत्रिकेतून वगळून टाकली असून त्यांना साधे आमंत्रण देण्याचे सौजन्यही सरकारने दाखवलेले नाही. विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठीच भाजपने हे डर्टी पॉलिटिक्स केल्याने शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून शिवसैनिक या पक्षपातीपणाचा कडकडीत निषेध करणार आहेत.

नवी मुंबई येथील उलवा येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. मात्र अपेक्षेनुसार भाजपने रडीचा डाव खेळत निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, राजन विचारे, आमदार मनोहर भोईर यांची नावे जाणीवपूर्वक छापलेली नाहीत. तसेच या कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही दिले नाही. या अपमानित वागणुकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने विमानतळाच्या भूमिपूजनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद आहे. पण विकासात कधीही राजकारण न करणाऱया शिवसेनेला भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून डावलल्याचे राजकारण सत्ताधारी भाजपने केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी आणि जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निषेधाचे पत्र दिले आहे. – संजय मोरे, शिवसेना रायगड संपर्कप्रमुख

हा जनतेचा अपमान
सध्या राज्यात व केंद्रात असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार लोकभावना पायदळी तुडवीत आहेत. मी जनतेमधून निवडून आलेला खासदार आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून भाजप नेते जे सूडाचे राजकारण करत आहे त्याने माझा नव्हे तर मला निवडून दिलेल्या जनतेचा अपमान आहे.
– खासदार श्रीरंग बारणे