धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी शिवसेना न्यायालयात जाणार

सामना ऑनलाईन । नाशिक

मोकळ्या भुखंडांवरील धार्मिक स्थळांवर कारवाईच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. याविरुद्ध शिवसेनेतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत महापालिकेने शहरात मोकळ्या भूखंडांवरील ५७४ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. महासभेत मोकळ्या भूखंडांवर १५ टक्के बांधकामाचा ठराव केला आहे. तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. असे असताना सत्ताधारी भाजपच्या निष्क्रियतेमुळे धार्मिक स्थळांवर संकट कोसळले आहे. महापालिकेच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. मंदिर विश्वस्तांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा. मंदिरांचे फोटो व तत्सम उपलब्ध कागदपत्रे द्यावीत, असे आहावन करण्यात आले.