शिवसेना स्वबळावर लढणार, सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

सामना ऑनलाईन । नवी मुंबई 

भाजपला जरी आता मैत्रीची आठवण होत असली तरी भाजपबरोबर युती होईल या भ्रमात कोणीही राहू नये. यापुढे लोकसभा आणि विधानसभेसह सर्वच निवडणुका शिवसेना एकटी लढून स्वबळावर सत्ता मिळवेलच, असे प्रतिपादन शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  केले.

नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात शिवसेनेचा मेळावा मोठय़ा उत्साहात पार पडला. ज्यांनी  शिवसेनेच्या मार्गात अपशकुन करून अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्यांची अवस्था आता केविलवाणी झाली आहे. छगन भुजबळ तुरुंगात आहेत, नारायण राणे महाराष्ट्रातून तडीपार झालेत आणि गणेश नाईक घरी बसले आहेत. नारायण राणे यांना जरी राज्यसभा मिळाली असली तरी सहा वर्षे त्यांची हिंदी आणि इंग्रजीची प्रॅक्टिस करण्यात जाणार आहेत, असा टोला देसाई यांनी लगावला.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, जिल्हा संघटक संध्या कढावकर, रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक नामदेव भगत, उपशहरप्रमुख गणपत शेलार, नगरसेवक काशीनाथ पवार आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महापालिका व सरकारमध्ये बॅडमिंटनचा खेळ

फेरीवाल्यांनाही व्यवसाय करून आपली उपजीविका करण्याचा हक्क आहे हे लक्षात घेऊन अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने फेरीवाला धोरण तयार केले होते, मात्र सध्या या धोरणावरून महापालिका व सरकारमध्ये बॅडमिंटनचा खेळ सुरू आहे. त्यामुळे फेरीवाला धोरण अद्याप तयार झालेले नाही. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिवसेनेने लढा उभारण्याची गरज आहे, असेही देसाई यावेळी म्हणाले.

युती व्हायलाच हवी!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी संघटित केलेली ताकद खूप मोठी आहे. या ताकदीच्या जोरावरच विरोधकांशी लढत आलो आणि पुढेही त्यांच्यावर मात करू शकतो. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती व्हायलाच हवी, असे स्पष्ट मत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, शिवसेनेशी आणि ठाकरे परिवाराशी माझे वेगळे नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध घनिष्ठ होते. तीच परंपरा आजही सुरू आहे. शिवसेनेबाबत माझं मत नेहमीच सकारात्मक आहे. परंतु युतीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली.