शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनहिताचे निर्णय घ्यावे लागतात- नीलम गोऱ्हे

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

“शिवसेना सत्तेत असली तरी शिवसेना चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवते. सरकारच्या कामकाजाबाबत थोडी खुशी थोडा गम आहेच. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळेच सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागले” अशी सडेतोड भूमिका शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाच्या निमित्ताने त्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या.

आमदार गोऱ्हे म्हणाल्या की, २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत कोणतीही तयारी नसताना शिवसेनेने जोरदार लढत देत ६३ जागा जिंकल्या. २०१९ मधील विधानसभा निवडणूकीत शिवसेना बहुमत मिळवेल असा आत्मविश्वास आमदार गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुखांनीच हिंदुत्वाचा विचार दिला

अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या विषयावर आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हिंदुत्वाचा विचार दिला आहे आणि तोच विचार घेऊन पुढे जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे रामभक्त म्हणून अयोध्येत जाणार आहेत त्यामुळे कुणीही त्याचे राजकीय अर्थ काढू नयेत असा सल्ला आ.गोऱ्हे यांनी विरोधकांना देताना मंदिर वही बनायंगे तारीख नही बताएंगे अशी भाजपची भूमिका असल्याची टिका केली.

शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरी तालुक्यातील काही मंदिरांना भेटी दिल्या. समुद्र किनारी असलेल्या मंदिराना सीआरझेड मधून सूट मिळण्याकरीता हिवाळी अधिवेशनात प्रयत्न करणार आहे. गणपतीपुळे मंदिराच्या विकासाठी निधी मिळण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.