शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळेल!

सामना ऑनलाईन । कराड

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेनेला चांगले यश मिळेल असा आशावाद शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कनेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

शिवसैनिक राहुल फाळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर कराडमधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. खासदार कीर्तिकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मतांचा ओघ चांगला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी शिवसेनेचे हिंदूराव निंबाळकर विजयी झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने रिपाइंला जागा सोडली होती. त्यावेळी उमेदवाराला अडीच लाखांच्या वर मते मिळालेली आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात गतवेळचा उमेदवार अल्पमतांनी पराभूत झाला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या बाजूने आहे. यामुळे कोल्हापूरची जागा आगामी निवडणुकीमध्ये आम्ही जिंकणारच असा विश्वासही खासदार कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेच काय ते ठरविणार
भाजपचा एक मंत्री स्वबळावर लढायचे म्हणतो तर दुसरा मंत्री युती करून लढायचे म्हणतो. तुम्ही काय ठरवायचे ते ठरवा, शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच काय ते ठरविणार आहेत, असेही खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.