सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

सामना ऑनलाईन । सिंधुदुर्ग

जिह्यातील देवगड, कुडाळ, वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील काही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. वेंगुर्ल्यातील तीन तर देवगडातील चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला वेंगुर्ले तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मातोंड, पेंडूर, खानोली, वायंगणी या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मातोंड, पेंडूर व वायंगणी या तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेनेच्या सरपंचांनी तर खानोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव विकास पॅनेलने बाजी मारली आहे.

खानोली ग्रामपंचायत – सरपंच – फ्रणाली खानोलकर (२७८ मते), मातोंड ग्रामपंचायत – सरपंच – जान्हवी परब (८५६ मते), वायंगणी ग्रामपंचायत – सरपंच – सुमन कामत (२८४ मते) तर पेंडूर ग्रामपंचायत – सरपंच – गीतांजली कांबळी ६३४ मतांनी विजयी झाल्या.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, महिला आघाडी प्रमुख वर्षा पवार व अन्य प्रमुख पदाधिकाऱयांनी शिवसेनेच्या विजयासाठी हे तालुके पिंजून काढले होते.

देवगडात चार ग्रामपंचायती शिवसेनेकडे
देवगड तालुक्यात २६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या वळीवंडे, वानिवडे, पावणाई, विठ्ठलादेवी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच विजयी झाले असून रामेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत समर्थ विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर फणसगाव ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलचे सरपंच विराजमान होऊन शिरवली ग्रामपंचायतचे सरपंचपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. एकंदरीत पाहता देवगड तालुक्यात ७ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार सरपंचपदावर निवडून आले असून अन्य ३ ग्रामपंचायत सरपंचपदावर भाजपा, समर्थ विकास पॅनेल व गाव पॅनेल यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.