हिंगोलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विक्रमी विजय, सहाही मतदारसंघात 40 हजारांच्यावर मताधिक्य

208
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, हिंगोली

शिवसेनेने हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विक्रमी मतांनी विजय मिळवत दिमाखाने भगवा फडकविला. शिवसेनेचे हेमंत पाटील हे मतदान यंत्र व पोस्टल मतांच्या अंतिम मोजणीनंतर 2 लाख 77 हजार 856 इतक्या मताधिक्याने विजयी झाले असून मध्यरात्री 2 वाजुन 54 मिनिटांनी निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी टाकली. दरम्यान, सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेला 40 हजाराच्यावर मताधिक्य मिळाले असून सर्वाधिक 56 हजार 391 मतांची आघाडी उमरखेडमधून तर हिंगोलीतून 41 हजार 489 मतांची आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या हदगाव या होम टाऊनमध्ये शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी 43 हजार 195 मते जास्त घेऊन ताकद दाखवून दिली.

हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या मतमोजणीचे कामकाज रात्री 2 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व त्यांच्या टिमने पुर्ण केले. रात्री सव्वा दोन वाजता भारत निवडणुक आयोगाकडुन निकालावर व मतमोजणीला मान्यता दिल्याची मोहर उमटल्यावर जिल्हा प्रशासनाने तब्बल 45 मिनीटानंतर आकडेवारी घोषीत केली. तर विधानसभा निहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची अंतिम आकडेवारी तसेच पोस्टल मतांच्या बेरजेसह झालेले मतदान आज 24 मे रोजी दुपारी 4 वाजता प्रशासनाकडून देण्यात आले. शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांच्यापेक्षा मताधिक्य घ्यायला सुरुवात केली.

शिवसेनेची ही विजयी घौडदौड शेवटच्या 27 व्या फेरीपर्यंत तसेच पोस्टल मतदानातही कायम राहिली. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 1 लाख 8 हजार 741 तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 52 हजार 350 मते मिळाली असुन वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांना 22 हजार 223 मते मिळाली. उमरखेड विधानसभा क्षेत्रातून 56 हजार 391 मतांची आघाडी शिवसेनेला मिळाली. किनवट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 92 हजार 386 तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 48 हजार 531 मते मिळाली असुन वंचित बहुन आघाडीचे मोहन राठोड यांना 17 हजार 232 मतांचा कौल जनतेने दिला. किनवट विधानसभा क्षेत्रातुन 43 हजार 855 मतांची आघाडी शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी घेतली.

वसमत विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 1 लाख 869 तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 52 हजार 646 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांना 33 हजार 348 मते मिळाली. वसमत विधानसभा क्षेत्रातुन 48 हजार 223 मतांची आघाडी देत शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे वसमतकरांनी सिद्ध केले. हदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 93 हजार 433 मते तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 50 हजार 238 मते मिळाली असून वंचित बहुन आघाडीचे मोहन राठोड यांना 28 हजार 670 मते मिळाली. हदगाव विधानसभा क्षेत्रातुन 43 हजार 195 मतांची आघाडी शिवसेनेला देत मतदारांनी वानखेडे यांच्या दलबदलुपणाला नापसंती दर्शविली. विद्यमान खासदार राजीव सातव यांचे होमपिच असलेल्या कळमनुरीतही काँग्रेसचा चांगलाच धुव्वा उडाला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 96 हजार 35 तर काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 52 हजार 724 मते मिळाली असुन वंचित बहुन आघाडीचे मोहन राठोड यांना 38 हजार 442 मते मिळाली. कळमनुरी विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 43 हजार 311 मतांचे मताधिक्य देऊन मावळते खासदार सातव व काँग्रेसला जनतेने जोरदार धक्का दिला. हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला  41 हजार 489 मतांचे मताधिक्य मिळाले असुन हिंगोलीकरांनी शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 91 हजार 928, काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 50 हजार 439, वंचित बहुजनचे मोहन राठोड यांना 33 हजार 473 असे मतदान केले.

वंचितच्या राठोडसह 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकुण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. यापैकी शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे सुभाष वानखेडे हे दोन उमेदवार वगळता अन्य 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.  वंचित बहुजन आघाडीचे माहेन राठोड, संदेश चव्हाण व अन्य 24 उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या