शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, या मागणीसाठी आज मंगळवारी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना घेरोओ आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यावेळी खासदार जाधव यांनी शुक्रवार, २१ सप्टेंबर रोजीचा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने माता भगिणींनी सहभागी व्हावे, असेही आवाहन खासदार जाधव यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

शहरातील हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कृषी महाविद्याय, इंजिनिअरिंग कॉलेज, दंत वैद्यकीय महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज व त्या विरोधात संताप व्यक्त केला. खासदार जाधव यांनी या प्रश्नी प्रखर भूमिका घेतल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, परभणी शहरात ५६० खाटांचे रुग्णालय आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे सर्व निकष पूर्ण असूनही आम्हाला मेडिकल कॉलेज का मिळत नाही? वैद्यकीय प्रवेशाच्या प्रादेशिक निकषामुळे येथील विद्यार्थ्यांना नेहमी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित रहावे लागते. या महाविद्यालयामुळे हा अन्याय दूर होईल. तसेच शहरातील व जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक सुविधांच्या अभावी वारंवार नांदेड, संभाजीनगर, पुणे येथे जावे लागते. ते या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे परभणीत शक्य होईल. अनेक रुग्णांचे प्राण वाचतील, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रा. मोडक, प्रा. शेजूळ, अनंत पांडे, रवीराज देशमुख, आनंद भरोसे, सुशील देशमुख, मुख्याध्यापक वेंâद्रेकर, मेने, ए.यु. कुलकर्णी, नाईक, प्रा. डहाळे, कदम, हुलसुरे, रणखांबे, खांडविकर, प्रा. संदीप नरवाडकर, मुख्याध्यापक शिंदे, प्रबोध देशपांडे, विलास बाबर, प्रा. गुंडेवार, चव्हाण, प्रा. देशपांडे, अनुराधा लाड, प्रा. अनुराधा लाड, प्रा. मोताफळे, प्रा. बाळासाहेब जाधव तसेच सर्व पक्षाचे नेते, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद, अनेक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.