शिवशक्ती कबड्डी; खडा हनुमान, जाकादेवी संघांचे चुरशीचे विजय

7

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवशक्ती महिला संघाने ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यात आयोजित केलेल्या अ, ब, क गट कबड्डी स्पर्धेत ‘क’ गटात लोअर परळच्या खडा हनुमान सेवा संघाने काळेवाडीच्या विघ्नहर्ता संघावर 29-27 अशी 2 गुणांनी तर जाकादेवी संघाने बळीराम क्रीडा मंडळावर 36-30 असा चुरशीचा विजय मिळवत आपली विजयी दौड कायम राखली. दैनिक ‘सामना’चे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. खडा हनुमानच्या विजयात गणेश जाधव, आदेश खरात (चढाया) व मेहुल पाटील (पकडी) यांनी सिंहाचा वाटा उचलला. पराभूत संघाच्या राज बेलोसे, कुणाल आवरे (चढाया) आणि संकेत गांधी (पकडी) यांची झुंज संघाचा पराभव टाळू शकली नाही. याच गटातील दुसऱ्या लढतीत रोहित धनावडेच्या पल्लेदार चढाया आणि तुषार मांडवकरच्या अफलातून पकडीच्या खेळाच्या बळावर जाकादेवी संघाने बळीराम संघाचे आव्हान 36-30 असे संपुष्टात आणले. पराभूत बळीराम संघाचे सूरज महाले, तेजस पासिलकर (चढाया) व राजू कहार (पकडी) यांनी स्तुत्य अशी झुंज दिली, पण अखेर त्यांच्या संघाला 6 गुणांनी पराभव पत्करावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या