शिवशक्ती कबड्डी; साऊथ कॅनरा, सूर्यकांत संघांचे निसटते विजय

98

सामना ऑनलाईन । ना. म. जोशी मार्ग

शिवशक्ती महिला संघ आयोजित आणि मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित कबड्डी स्पर्धेत ‘अ’ गटात साऊथ कॅनरा व सूर्यकांत क्रीडा मंडळ या संघांनी केवळ एक गुणाने निसटता विजय मिळवत आगेकूच केले. पहिल्या लढतीत साऊथ कॅनरा संघाने अमर हिंद मंडळ संघाला 25-24 असे पराभूत केले. अविनाश थोरवे (चढाया) आणि किरण गरजे (पकडी) यांनी साऊथ कॅनराच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पराभूत अमरहिंदचे ओंकार पाटील (चढाया) तर दिनेश बापर्डेकर (पकडी) यांचा झेल अतिशय प्रेक्षणीय झाला. याच गटातील दुसऱ्या लढतींतही सूर्यकांत क्रीडा मंडळ संघाने ओम् विद्यार्थी संघावर 45-44 अशी निसटती मात करीत विजय नोंदवला. दै. ‘सामना’ने या स्पर्धेला विशेष सहकार्य दिले आहे. ‘ब’ गटातही अतिशय अटीतटीच्या लढतींत अमर प्रतिष्ठान संघाने श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिर संघावर 40-39 असा एक गुणाने विजय मिळवला. छत्रपतीच्या लक्ष्मण आरेकर (चढाया) आणि शाम राणे (पकडी) यांनी चमकदार खेळ केला. तर विजयी अमरच्या स्वप्नील कुळये (चढाया) व आकाश कदम (पकडी) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

आपली प्रतिक्रिया द्या