भाषण थांबविणे ही एकप्रकारची अराजकताच, व्यवस्थेविरोधात बोलतच राहणार – अमोल पालेकर

2
amol-palekar-govt

सामना प्रतिनिधी । पुणे

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे केकळ कलाकारापुरतेच मर्यादित नाही. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि याबद्दल बोललो तर माझे भाषण थांबविले जाते याबद्दल मला अत्यंत दु:ख वाटते. ही एकप्रकारची अराजकता असून जे मला पटणार नाही त्याविरोधात आणि व्यवस्थेमध्ये असलेल्या दोषांबद्दल मी यापुढेही कायम बोलतच राहणार असा निर्धार ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केला.

मुंबईतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ या ठिकाणी ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गॅलरीच्या व्यवस्थेसंदर्भात झालेल्या गोष्टींसंदर्भात बोलत असताना अमोल पालेकर यांना संयोजक आणि गॅलरीच्या संचालिका अनिता रूपवर्धिनी यांनी मध्येच थांबवले. त्यामुळे अमोल पालेकर यांनी भाषण अर्धवट सोडले. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या घटनेचा अमोल पालेकर यांनी तीव्र निषेध केला आणि मी माझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी आणि व्यवस्थेमध्ये मला जे चुकीचे वाटते त्याबद्दल बोलत राहणार असा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ रंगकर्मी संध्या गोखले यावेळी उपस्थित होत्या.

अमोल पालेकर म्हणाले, ‘मॉडर्न आर्ट गॅलरी’च्या कार्यक्रमात मी औचित्याला धरून बोलत नव्हतो हे संयोजकांचे म्हणणे चुकीचे आहे. मी कुठे आणि काय बोलावे हे ते ठरवू शकत नाहीत. मी भाषण करण्याअगोदर त्यांना मी काय बोलणार आहे हे लिहून द्यायचे का, असा सवालही अमोल पालेकर यांनी यावेळी केला. माझे भाषण थांबविण्यामागची शक्ती एकप्रकारे माझेच नव्हे, तर कलाकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आणत असून ही गळचेपी असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये नवीन आलेल्या संचालक मंडळाने केलेल्या नियमांमुळे नवीन कलाकारांना त्यांचे प्रदर्शन भरवण्यासाठी मोठी अडचण येणार आहे. याबद्दल सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन बोलणे आवश्यक आहे. परंतु मी बोललो तर त्यांना इतके वाईट काटण्याचे काय कारण आहे? मी कोणालाही घाबरणारा नाही. हा लढा केवळ माझ्या एकट्याचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. नाटक आणि सिनेमामध्ये व्यक्त होण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य आयुष्यामध्येही बोलताना पूर्वपरवानगी घ्यायची का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे अमोल पालेकर यांनी यावेळी सांगितले.

संध्या गोखले म्हणाल्या, आपल्याविरोधात कोणी बोलू नये यावर विविधप्रकारे अंकुश ठेकण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालेकर यांचे भाषण थांबविणे हा त्यापैकीच एक प्रकार होता. हा केवळ एका कलाकाराचा प्रश्न नाही तर माणसाला त्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे की नाही आणि त्यासाठी आपण लढा देणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. यासाठी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.

सरकारविरोधात काही होणार नाही याची दक्षता घ्या!

‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे कार्यक्रम होण्यापूर्वी हा सरकारचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी सरकारच्या विरोधात काहीही बोलले जाणार नाही आणि सरकारविरोधी कोणतीही घटना होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना केंद्रीय पातळीकरून आर्ट गॅलरीच्या संचालक मंडळाला मिळाल्याचे मला नंतर कळाले, असेही अमोल पालेकर यांनी याकेळी सांगितले.