महिला बंडखोरांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गोळ्या घाला!

सामना ऑनलाईन। मनिला

फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी पुन्हा एकदा महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महिला बंडखोरांना जीवे मारू नका तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्येच गोळ्या घाला असे त्यांनी सैनिकांना सांगितले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सैनिकांना सांगा यापुढे एक नवीन आदेश लागू होत असून त्याअंतर्गत महिला बंडखोरांना जीवे मारू नका, तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये गोळ्या घाला.

महिलांवर अशी टीप्पणी करण्याची दुतेर्ते यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी जवानांसमोर महिलांशी संबंधित वादग्रस्त विधानं केलेली आहेत. गेल्या वर्षी इसिस या दहशतवादी संघटनेबदद्ल बोलतानाही त्यांनी असेच भयंकर विधान केले होते. जर एखादा सैनिक तीन महिलांवर बलात्कार करत असेल तर त्याचे सर्व आरोप आपण स्वत:वर घेण्यास तयार आहोत असे दुतेर्ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

त्यानंतर गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने हिंदुस्थान दौऱ्यावर आले असतानाही दुतेर्ते यांनी महिलांवर अश्लिल टीप्पणी केली होती. फिलिपाईन्समध्ये पर्यटनाला चालना मिळावी यावर बोलताना त्यांची जीभ घसरली होती. यासाठी त्यांनी चक्क इसिसच्या दहशतवाद्यांचा दाखला दिला होता. ज्याप्रमाणे इसिस तरुणांना गटात सामील करुन घेताना ७२ हुर सुंदरीचे आमिष दाखवतात. त्याप्रमाणेच मी देखील फिलिपाईन्समध्ये येणाऱ्यांना प्रत्यक्षात तशा सुंदऱ्या दाखवू शकतो. इसिस तर जन्नतमध्ये गेल्यानंतर सुंदरी देण्याचा दावा करते पण मी स्वर्गात नाही तर येथेच अशी व्यवस्था करू शकतो असं दुतेर्ते यांनी इंडिया बिझनेस फोरममध्ये म्हटलं होते.

७ फेब्रुवारीला ते शरणार्थींना संबोधित करत होते. यावेळी सशस्त्र महिला बंडखोरांनाही लक्ष्य करण्याचे आदेश दुतेर्ते यांनी सैनिकांना दिले. पण या महिलांना थेट ठार न करता त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्येच गोळ्या घाला असा नवा आदेशच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुतेर्ते यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यामुळे आपण ते वक्तव्य मजेत केल्याचं ते म्हणाले आहेत.