कथा… परीक्षा

माधवी कुंटे

दिनकर रिटायर्ड झाला. दोन वर्षांचे एक्सटेन्शन मिळालं, पण त्याच काळात क्षमा त्याची बायको हार्ट ऍटॅकने गेली. दिनकरच्या जिव्हारी लागणारा घाव होता तो. पण त्याची सून सई खूप समजूतदार, शांत स्वभावाची होती. मुलगा शशांकही दिनकरची काळजी घेणारा होता. नातू अरुणिम पूर्वीसारखा आजीच्या मागे असायचा. तो आता दिनकरला चिकटला.

अकरा वर्षांचा पोर, पण महाचलाख. त्याला सारखं कशात तरी गुंतवून ठेवले नाही तर काहीही उचापती करायचा. त्याच्यावर रागावून चालायचं नाही. गरीब बापुडवाणं तोंड करून डोळय़ांत पाणी आणून मुसमुसत कोपऱयात बसायचा. दिनकरच्या मनात येई महानाटकी पोर, पण तो डोळय़ांतून पाणी काढू लागला की, आपण विरघळतो. याला सांभाळायला दहा माणसांचा फौजफाटा असला तरी अपुरा पडेल. क्षमा कशी सांभाळायची, तिचं तिलाच ठाऊक. अरूमुळे एकमात्र झालं दिनकर रिटायर्ड झाला तरी त्याला रिकामपण आलं नाही. घरात इतर कामांना नोकरचाकर असले तरी अरूची जबाबदारी क्षमानंतर आपोआप दिनकरवर येऊन पडली. ही जबाबदारी म्हणजे त्याच्या सहनशक्तीची आणि बुद्धीची कसोटी लागायची. काहीही करून अरूला गुंतवून ठेवायला लागायचं. नाहीतर मोबाईलवर गेम खेळ, टीव्हीवर कसलेतरी मुलांचे कार्यक्रम बघ, बाहेर जाऊन माळीकाकांना जबरदस्ती बॉलिंग टाकायला लाव आणि याने बॅट फिरवली की, चेंडू नेमका शेजारच्या बंगल्यावर जायचा. हे फार काळ चालू देणं धोक्याचं होतं. शेजारच्या बंगल्यातल्या मंदाकाकू लगेच तक्रार घेऊन यायच्या. याच्या क्रिकेटमुळे त्यांच्या बागेतील रोपं मरतात असा त्यांचा पहिला आरोप असे. मग अरूवरच्या तक्रारींच्या सटासट गोळय़ा सुटायच्या. शिवाय त्याला अभ्यासातही गुंतवणं भाग होतंच.

मग दिनकरनं एक शक्कल लढवली. अरू शाळेतून यायच्या आधी तो दोन-तीन प्रश्नपत्रिका काढून ठेवायचा. अरूचं कपडे बदलून जेवणखाण झालं, थोडं इकडे तिकडे झालं की, लगेच दिनकर म्हणायचा आजची परीक्षा आणि प्रश्नपत्रिका तयार आहे. हा चॅलेंज आहे. तुझ्यासाठी अरू ते सहज सोडवयाचा. मग परत नवं काहीतरी आजोबा-नातवाचं बुद्धिबळ वगैरे चालू व्हायचं. एक दिवस अरू म्हणाला, ‘‘आजोबा, भूत असतं ते वेडंवाकडं हसतं आणि वडाच्या झाडाला झोके घेतं.’’ दिनकर म्हणाला, ‘‘चल, असं काही नसतं.’’ ‘‘पण असतं आजोबा! मी पाहिलंय. त्या दिवशी शोतली क्रिकेटची प्रॅक्टिस आटोपली. माळीकाका घ्यायला आले तेव्हा अंधार पडला होता. वडाच्या झाडावरून ते उडय़ा मारत होतं. ‘रामराम’ करत माळीकाकांनी मला कसंबसं झाडापासून दूर नेलं.’’

‘‘हे! रात्र पडली की, झाडावर वटवाघळं झोके घेतात. उडतात. त्यातलं असेल काहीतरी.’’ दिनकर म्हणाला. त्यावर अरू ठासून म्हणाला, ‘‘नाही, आजोबा आहे. माळीकाका म्हणाले तिथे ब्रह्मराक्षस आहे. शाळेच्या कुंपणापुढे ते झाड आहे. अरे शाळेच्या पुढे कशाला गेलात?’ माळीकाकांना गावी काय काय वस्तू पाठवायच्या होत्या त्यांचा गाववाला तिकडे राहतो त्याला त्या वस्तू देऊन आम्ही निघालो तर हे भूत. बापरे!’’

‘‘च्यायला! काहीतरी बोलू नकोस’’ दिनकर म्हणाला. अरूने विचारलं, ‘‘च्यायला, म्हणजे काय?’’ दिनकर म्हणाला, ‘‘काही नाही. ते भूत आधी डोक्यातून काढ बघू.’’ ‘‘पण ते पाहिलंय मी! तुम्हीसुद्धा रात्री तिथे जाऊन बघा. दिसेल तुम्हाला.’’ ‘‘जाऊन दाखवतोच!’’ नि त्या वडाची पाने आणा म्हणजे खात्री पटेल माझी!’’ दिनकर म्हणाला, ‘‘आऱया चॅलेंज घेतला तुझ्या परीक्षेचा. मी जिंकलो तर तू दहा दिवस टी.व्ही. बघायचा नाही.’’ ‘‘ओके आजोबा.’’

दुसऱया दिवशी रात्री ९ वाजता दिनकर निघाला. अरूच्या शाळेच्या पुढे गेल्यावर त्याला थंड वाटू लागले. पुढे ते विशाल झाड. भयावहच होते. त्याची पानं तोडताना दिनकरला घाम फुटला. कुणीतरी धरून ओढल्यासारखं वाटलं. तो जवळपास धावतच परत निघाला. मागून कुणाची तरी चाहुल लागल्यावर तर तो स्तब्ध झाला. मागून अरू आला तेव्हा तो दचकलाच. बोबडी वळली. अरू म्हणाला, ‘‘चला आजोबा, तुम्हाला सोबत म्हणून मी आधीच इथे येऊन थांबलो होतो,’’ सायकल सांभाळत म्हणाला, ‘‘पण तुम्ही परीक्षेत पास झालात हं!’’ ‘‘आऱया, माझी परीक्षा घेतलीस?’’ निष्पाप चेहऱयाने तो म्हणाला, ‘‘हो, तुम्ही रोज माझी परीक्षा घेता. आज मी तुमची घेतली.’’ दिनकरनं त्याला टप्पल मारली आणि मग त्याला अनावर हसू कोसळलं.