अभिनय… काम… हेच जगणं…!

नितीन फणसे, [email protected]

शरद पोंक्षे… तत्त्वनिष्ठ अभिनेता… माणूस… त्यांच्या नव्या हिंदी मालिकेच्या निमित्ताने झालेल्या मनमोकळ्या गप्पा….

शरद पोंक्षे यांची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. रंगमंच तर त्यांचं कार्यक्षेत्रच… पण चित्रपट, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमांत मनसोक्त खेळणारा हा मनस्वी अभिनेता आता हिंदी मालिकांमध्येही दिसणार आहे. सोनीच्या सब टीव्ही वाहिनीवर ‘सजन रे फिर झूठ मत बोलो’ ही नवीन विनोदी मालिका २३ मेपासून सुरू होतेय. त्यात ते नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हिंदीत पदार्पणाबाबत ते खूपच उत्सूक आहेत. ते म्हणतात, ही मालिका रात्री ९ वाजता या प्राइम टाइमला सुरू होतेय. अतिशय योग्य वेळ आहे. जेव्हा सगळेजण ऑफिसमधून घरी आलेले असतात. शिवाय ९ ही झोपायचीही वेळ नाहीय. तेव्हा लोक टीव्हीच बघतात. वेळ अतिशय सुंदर आहे. मे महिन्याच्या सुट्टीत नेमकी ऑन एअर येतेय. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या पाठोपाठ ती टेलीकास्ट होत असल्याने फारच सगळं छान जुळून आलंय. श्रीमंत आणि गरीब यावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारी ही मालिका आहे. माझी भूमिकाही छान आहे.

कितीही झालं तरी मराठी चित्रपट, मराठी मालिका हे वातावरण वेगळं पडतं, तर हिंदी सिनेमा व मालिकांचं वातावरण वेगळं… यावर एक ज्येष्ठ अभिनेता या नात्याने शरद पोंक्षे यांनी खूप छान भाष्य केलं. ते म्हणतात, सगळीकडे कामच करायचं असतं. शेवटी अभिनय एकच असतो. पण हिंदीमध्ये लोक खूपच प्रोफेशनल वागतात. मराठीत तसं नसतं. आपल्याकडे वातावरण कुटुंबासारखं असतं. हिंदीत व्यावसायिक दृष्टीकोन असतो. त्यांना तुमच्या वैयक्तिक जीवनाशी काहीही पडलेली नसते. मराठीत प्रत्येकजण एकमेकांना पर्सनली ओळखत असतो. दुसरं म्हणजे मराठीला मर्यादा अशा येतात की या भाषेतील मालिका फक्त महाराष्ट्रातच पाहिल्या जातात. हिंदीचं तसं होत नाही. हिंदीतल्या मालिका देशभरचे प्रेक्षक बघतात. शेवटी प्रत्येक कलाकाराला आपल्याला अख्ख्या देशाने ओळखावं, आपल्या कामाची तारीफ करावी असं वाटत असतं. त्या दृष्टीने अतिशय योग्य वेळेला आणि योग्य अशीच ही मालिका आलेली आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमधला फरक स्पष्ट करताना पोंक्षे म्हणतात, तसा काही फरक नाही. फक्त भाषेचा फरक आहे. बजेटचा फरक आहे. मराठी मालिकेच्या एका एपिसोडचं बजेट दीड लाख असतं. हिंदीत तेच एका एपिसोडचं बजेट सात-आठ लाखांना जातं. हा फरकच सगळी गणितं बदलून टाकतो. हिंदीतल्या मालिका अख्खा देश बघतो. मराठी मालिका फक्त महाराष्ट्र बघतो. ही मर्यादा आहे. ती प्रत्येक भाषेला आहे. तमीळ, तेलुगू आपल्याकडे बघितलं जात नाही. मग मराठी तरी त्या राज्यांत लोक का बघतील?

अनेकांचा विरोध पत्करून ‘नथुराम’चे प्रयोग सुरूच आहेत. ते असेच अखंड चालू राहणार असा ठाम आत्मविश्वास पोंक्षे यांना आहे. कारण नाटक हाच त्यांचा श्वास आहे. हे नाटक चालू ठेवूनच आपण ही हिंदी मालिका करू, अशी त्यांची अटच होती. त्यांच्यासारखा नट मिळत असताना त्यांच्या अटी मान्य करण्याशिवाय निर्मात्याकडे कोणता पर्याय उरणार…? त्यांनी पोंक्षे यांना लगेच तशी मुभा दिलीय. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. याबाबत ते सांगतात, कुणी कितीही राडे घालू दे. प्रेक्षक नाटकाला भरभरून येतात. प्रचंड दाद देतात. हे सगळे राडे फक्त आणि फक्त निवडणुकीपुरते आहेत. एकदा निवडणूक संपली की थांबणार सगळं… आताही महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी असंच झालं. निवडणूक होईपर्यंत विरोधकांचं गांधीप्रेम एवढं उतू जात होतं की विचारू नका. पण १९ फेब्रुवारी उजाडली आणि याच लोकांना काहीच वाटेनासं झालं. आता त्यांचं गांधीप्रेम २०१९ साली निवडणुका जाहीर झाल्यावर पुन्हा उफाळून येईल. त्याला काही अर्थ नाही. एक तर गांधी कुणाला कळले नाहीत. ज्याला गांधी खरे कळले असतील ते मारामारी करायला येणार नाहीत. कारण मारणं, जाळणं, सत्याचा आवाज बंद करणं गांधींच्या तत्वात बसत नव्हतं. पण या लोकांना ते कळलं असतं तर ते मारामारीसाठी आले नसते.

विनोदी नाटक करायचंय..खूप काही करायची इच्छा आहे. खूप नाटकात काम करायचीय. नाटकांत विनोदी भूमिका करायची खूप इच्छा आहे. म्हणावं तशी विनोदी भूमिका माझ्याकडे आलेली नाही. त्याच्या प्रतीक्षेत आहे. बघूया. कधी मिळतेय ती. सगळे नशिबाचे खेळ असतात. ऑफर यावी लागते. ते काही आपल्या हातात नाही. त्यासाठी मला निर्माता व्हावं लागेल. तर माझ्या मनासारखी भूमिका तयार करेन. विनोदी नाटक काढेन. आत्तातरी ‘नथुराम गोडसे’ हे एकमेव नाटक नजरेसमोर आहे. दुसरं काही नाहीय. हिंदी मालिकेत यापूर्वी अनिल कपूरबरोबर ‘ट्वेंटी फोर’ नावाची थरारक हिंदी मालिका केली होती. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, आत्तापर्यंत माझ्यावर जसं प्रेम केलंत तसं या मालिकेलाही डोक्यावर घ्या. टीआरपी तुमच्या हातात आहे. तो वाढला की आम्ही पुढे जाणार. मग महाराष्ट्राला पुढे नेणार.

सगळी माध्यमं आवडतात..नाटक, सिनेमा की मालिका… असं माध्यम वेगळं वगैरे काही नसतं. सगळीकडे कामच करायचं असतं. सगळीच माध्यमं मला आवडलेली आहे. त्या त्या माध्यमामध्ये मी त्या त्या पद्धतीने काम करतो. सगळ्याच गोष्टी चांगल्या एन्जॉय करतो. त्यामुळे त्यातलं हे मला जास्त आवडतं. नथुरामाची कोणती बाजू आवडली? असं विचारता, बेलाशकपणे शरद पोंक्षे म्हणतात, मला वाटतं नथुरामाने जे कृत्य केलं ते दुसऱयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलं नाही. जे केलं ते स्वतः केलं. तो घाबरला नाही. हे त्याचं फार मोठं वैशिष्टय़ आहे.