सायनाच्या चरित्रपटातून श्रद्धा कपूर ‘आऊट’, परिणीती ‘इन’

सामना ऑनलाईन, मुंबई

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटातून श्रद्धा कपूर बाहेर पडली आहे. तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे. या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने  सायनासारखं दिसण्यापासून ते बॅडमिंटनच्या कसून सरावापर्यंत बरीच मेहनत घेतली होती. श्रद्धा कपूरकडे असलेल्या इतर चित्रपटांमुळे तिने दिग्दर्शकांशी बोलूनच हा चित्रपट सोडल्याचं सांगण्यात आलं आहे.

श्रद्धा कपूरला काही महिन्यांपूर्वी डेंग्यू झाला होता. एप्रिल महिन्यापर्यंत ती बरी झाली नव्हती. आजारपणामुळे अपेक्षित काळामध्ये चित्रपटाचं शूटींग पूर्ण होऊ शकलं नाही. बरं झाल्यानंतर नव्या चित्रपटांसाठी आधीच तारखा दिल्या असल्याने आपल्याला या चित्रपटासाठी काम करायला वेळ मिळणार नाही, असं श्रद्धाने सांगितलं. श्रद्धा सध्या ‘छिछोरे’ या चित्रपटाचं काम संपवत आहे. त्यापाठोपाठ तिच्या स्ट्रीट डान्सर 3D या चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रभासची प्रमुख भूमिका असलेला साहो प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणारी श्रद्धा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणार आहे. त्यानंतर लगेचच बागी 3 च्या शूटींगला सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रद्धासोबत तारखा जुळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला त्यामुळे त्यांना नवी नायिका शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. अखेर चित्रपटासाठी परिणिती चोप्राची निवड करण्यात आली.

सायना नेहवालने तिच्या धडाकेबाज खेळामुळे हिंदुस्थानची मान उंचावली आहे. ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या सायनाने आत्तापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहे. यामध्ये 11 सुपरसिरीज स्पर्धेतील पदकांचाही समावेश आहे. 2015 साली सायना बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर होती. जगभरातून कौतुकाच्या वर्षावात नाहून गेलेल्या सायनाची भूमिका साकारायला मला आवडेल असं परिणितीने म्हटलं आहे. या चित्रपटासाठी कसून सराव करायला लागणार असून त्यासाठी मी सज्ज झाल्याचंही तिने सांगितलं आहे.