।। श्री साईगाथा ।। भाग २६ वा – गुरु साक्षात परब्रह्म

  • विवेक दिगंबर वैद्य

राधाबाईला उपदेश करण्याच्या निमित्ताने साईबाबांनी अवघ्या जगालाच उपदेशामृत पाजले आहे. उपदेश आणि अनुग्रह यावर भाष्य करताना साईंनी आपल्या गुरूंशी केलेल्या एका संवादाचे हे रूपक श्रीसाईसच्चरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात आले आहे.

साई म्हणतात की, ‘मीदेखील माझ्या गुरूच्या सान्निध्यात असतेवेळी त्यांनी कानमंत्र द्यावा असा आग्रह करीत असे, मात्र गुरूंनी त्यास प्रतिसाद दिला नाही उलट त्यांनी एकदा माझ्याकडे दोन पैसे द्यावे अशी मागणी केली. हे दोन पैसे म्हणजे ‘श्रद्धा आणि सबुरी’ रूपी दोन नाणी. गुरूंना अभिप्रेत असलेली ही दोन नाणी मी लागलीच त्यांना अर्पण केली. त्यामुळे गुरु मजवर प्रसन्न झाले.’

26-saibaba

बाबा म्हणतात, ‘धैर्य म्हणजे सबुरी. सबुरी नेहमीच भीती दूर करते, संकट अन् लाचारी दूर घालवते. ज्याच्याकडे सबुरी आहे त्याच्या वाटय़ाला यश येते. श्रद्धा व सबुरी या जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. सबुरी नसेल तर माणसाचं आयुष्य व्यर्थ आहे. ‘शिष्य’ स्वकर्तृत्वावर पुढे यावा अशी गुरूची धारणा असते. मी बारा वर्षे गुरूच्या सोबत राहिलो. गुरूने माझ्यावर पोटच्या पोराइतके प्रेम केले. मी रात्रंदिवस गुरूंचे मुख पाहात राहायचो. तहानभुकेचा मला कधी त्रास झाला नाही. कारण गुरू हेच माझे अनुसंधान होते. माझा गुरु मला नेहमी सांगत असे, ‘तू फक्त माझ्याकडे लक्ष दे म्हणजे तुला परमार्थाचे ज्ञान प्राप्त होईल. तू माझ्याकडे सतत पाहात राहा मग मीही सातत्याने तुझ्याकडे लक्ष पुरवीन.’तू मजकडे अनन्य पाही। पाहीन तुजकडे तैसाच मीही!!’ गुरूंना जाणण्यासाठी सहा शास्त्रs आणि अठरा पुराणांचा उपयोग नाही. फक्त गुरूविषयी श्रद्धा हवी, त्यांच्यावर विश्वास हवा. गुरु हाच कर्ता आहे, हर्ता आहे. गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे जो कुणी जाणतो आणि मान्य करतो तो त्रैलोक्यात धन्य समजावा.’

साईंची प्रेमळ वाणी आणि शीतल, मधुर शब्दाने राधाबाईंच्या मनाची घालमेल व जिवाची तगमग शांत झाली. गुरूंवरील ‘श्रद्धा’ हाच साईंचा उपदेश आहे असे मानून राधाबाई सुखावली आणि गुरुचरणी लीन झाली. गुरूंनी साईंकडे मागितलेल्या दोन पैशावरून सहजपणे साईंच्या अवतारकार्यातील आणखी एक प्रसंग आठवला. गुरुतत्त्वाचा गूढ संदर्भ म्हणून या प्रसंगाकडे पाहण्यास हरकत नाही.

मुंबईच्या हरिश्चंद्र पितळे यांच्या मुलाला फेफरे येण्याच्या व्याधीने त्रासले होते. अनेक औषधोपचार तसेच लौकिक व अलौकिक प्रयत्न झाले तरी मुलाची व्याधी काही दूर होईना. अखेरीस कुणा साईभक्ताच्या सल्ल्यानुसार पितळे दांपत्य मुलासह शिर्डीस आले. उभयतांनी व्याधिग्रस्त मुलास साईचरणांवर घातले तोच ते बालक तोंडाला फेस येऊन बेशुद्ध पडले. त्याच्या सर्वांगास घाम सुटला, शरीर थंड पडू लागले आणि त्याची जिवंत राहण्याची आशा खुंटली. पितळे दांपत्य हवालदिल झाले तेव्हा बाबांनी त्यांना सावरले अन् सांगितले, ‘काळजी करू नका. घटकाभराने त्याच्या शरीरास धुगधुगी येईल. बरा होईल तो.’ साक्षात जगच्चालकाचे शब्द, मग ते खोटे कसे ठरणार! मुलगा ठणठणीत झाला. पुढे काही दिवस शिर्डीस राहून मुलाची व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याने आनंदी झालेले पितळे दांपत्य माघारी निघाले. उभयता साईदर्शनार्थ आले असता बाबांनी खिशातून तीन रुपये काढले, पितळेंच्या हातावर ठेवले आणि म्हणाले, ‘बापू! मी पूर्वी तुला दोन रुपये दिले होते, त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा करीत राहा. तुझे कल्याण होईल.’

हरिश्चंद्र पितळे आनंदाने घरी परतले खरे, मात्र त्यांना बाबांच्या तीन रुपयांबद्दलच्या त्या बोलण्याचा संदर्भ काही केल्या लागेना. जेव्हा ही गोष्ट पितळेंनी त्यांच्या मातोश्रींस सांगितली तेव्हा ती माऊली म्हणाली, ‘बाबा म्हणाले ते अगदी खरे आहे! तू तुझ्या मुलाला जसे शिर्डीस नेलेस तसेच तुझ्या वडिलांनी तू लहान असताना तुला अक्कलकोटास नेले होते. तेव्हा अक्कलकोटकर श्रीस्वामीसमर्थांनी प्रसाद म्हणून त्यांच्या हातावर दोन रुपये ठेवले होते. साईंचे बोलणे त्या संदर्भाला अनुसरून होते हे लक्षात ठेव.’