वाघजाईचा शिमगोत्सव

श्री क्षेत्र टेरव येथील कुलदैवत व ग्रामदैवत श्री कुलस्वामिनी भवानी-वाघजाई देवस्थानचा फाल्गुन महिन्यातील शिमगोत्सव सालाबादप्रमाणे यंदाही १३ मार्चपासून सुरू होणार आहे. या उत्सवासाठी देवस्थानात जय्यत तयारी सुरू झाली आहे. १२ मार्च रोजी (फाल्गुन पौर्णिमा) रात्री १० वाजल्यानंतर प्रत्येक वाडीतील लोक पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करून तिचे दहन करतील. १३ मार्च रोजी सकाळी भवानी-वाघजाई मंदिरासमोर गावाची होळी (होम) उभी करून पारंपरिक पद्धतीने गावातील मानकऱयांच्या हस्ते पूजा केली जाईल. मंदिरातून पालखी सजवून समोरील सहाणेवर ठेवली जाईल.

१३ तारखेला संध्याकाळी ४ वाजता पालखी वाजत-गाजत लिंगेश्वर येथील पुरातन शंकर मंदिराशेजारील सहाणेवर नेण्यात येईल. प्रत्येक वाडीत पालखीचे जल्लोषात स्वागत होईल. १४ मार्च रोजी पालखी गावातील प्रथम नागरीक विजय कदम आणि सुरेश कदम यांच्या घरी जाईल व नंतर निम्मेगाव येथे घरोघरी नेण्यात येईल. यात १५ मार्च, रोजी लिंगेश्वरवाडी, १६ मार्च रोजी राधाकृष्णवाडी, १७ मार्च रोजी तळेवाडी व दत्तवाडीत नेण्यात येईल.

१८ ते २४ मार्चपर्यंत पालखी अनेक पाडय़ांमधील ग्रामस्थांच्या घरोघरी नेण्यात येईल. या शिमगोत्सवास शहरातील सर्व चाकरमानी कुटुंबियांसह हजर असतात. पालखी कुठेही वास्तव्यास राहात नाही. रात्री मंदिरात आणली जाते. यावेळी रात्री ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱयासाठी उपस्थित राहतात. या कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहाते. सर्वच धर्माचे लोक या शिमगोत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी होतात.