गणपती माझा भाऊ

अभिनेत्री श्रेया बुगडे. अभिनय हीच तिची श्रद्धा आणि भक्ती आहे.

> देव म्हणजे? – सतत मिळणारी सकारात्मक ऊर्जा.

> आवडते दैवत? – गणपती हे माझं आराध्य दैवत आहे. मी त्याला भाऊ मानते म्हणून अनेक वर्षे राखी बांधते.

> लक्ष्मीदेवीची तुमच्या मनातली प्रतिकृती काय? – गृहलक्ष्मी हे लक्ष्मीचं रूप आहे. आता पूर्वीप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळींना एकत्र यायला वेळ मिळत नाही, पण जेव्हा आम्ही एकत्र येतो तो दिवसच आमच्यासाठी दसरा-fिदवाळी असते. अशी जी घरं असतात तिथे लक्ष्मीची सुख-समृद्धी आनंदाच्या रूपात कायम नांदते, असं मला वाटतं.

> लक्ष्मीपूजन कसं करता? – माझ्या सासरी लक्ष्मीपूजन मोठय़ा प्रमाणात केलं जातं. साग्रसंगीत पूजा असते. मोगऱ्याच्या फुलांनी देवीची प्रतिमा सजवली जाते. आरती म्हणतो. आज लक्ष्मीदेवी आपल्या घरी राहायला आली आहे अशा भावाने तिचं स्वागत केलं जातं. रांगोळी, पायाचे ठसे अशी जय्यत तयारी असते.

> नैवेद्य काय दाखवता?- घरात येणाऱ्या सवाष्णींना जे आवडतं तो नैवेद्य दिला जातो. हाच नैवेद्य प्रसाद म्हणून वाटतो. मलई बर्फी, काजू कतली, चितळेंकडचे लाडू, नारळाची बर्फी असते.

> लक्ष्मीदेवीकडे कोणती प्रार्थना करायला आवडेल? माझ्या जोडलेल्या माणसांकडून मला प्रेम, जिव्हाळा मिळाला. हीच माझी खरी संपत्ती आहे. कार्यक्रम लोकप्रिय होतोय. लोकांचं प्रेम मिळतंय ही तिची कृपाच आहे.

> लक्ष्मीदेवीची कोणती प्रतिमा अधिक भावते? – कमळात बसलेल्या लक्ष्मीची प्रतिमा पारंपरिक आहे. ती मला अधिक भावते. कारण एरवी आपण पैशाच्या मागे धावत असतो. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची पूजा करतो. खरं तर तिची आठवण आणि पूजा रोजच व्हायला हवी.

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – मी जे काम करतेय त्याची प्रेक्षकांकडून पोचपावती हे पैसे मिळवण्यापेक्षाही समाधान देणारं आहे.

> दुःखी असतेस तेव्हा? – आईशी बोलते. कारण ती फार सकारात्मक आहे किंवा खरेदीला जाते.

> लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणती खरेदी करायला आवडेल? – मला दागिने, कपडे सगळ्याच प्रकारची खरेदी करायला आवडते. मोठय़ा वस्तूंपासून बारीकसारीक वस्तूही आवडीने विकत घेते.

> यावेळच्या लक्ष्मीपूजनाला देवीकडे काय मागणं मागाल? – मी देवीकडे काहीही मागणार नाही. माणसांच्या आणि प्रेमाच्या रूपात तिने मला भरभरून दिलं आहे.