श्री राम प्रसन्न!

>>प्रतिनिधी

येत्या रविवारी रामनवमी. त्यानिमित्ताने मुंबईतील काही निवडक राममंदिरांचा परामर्श…

आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श योद्धा, कर्तव्यदक्ष प्रजापालक, मातृभक्त आणि मर्यादापुरुषोत्तम श्रीराम… हिंदू धर्मीयांच्या या लाडक्या दैवताचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला.  श्रीरामाचे जीवन, त्याची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य, सारंच काही वंदनीय आणि आचरणीय…यासाठी दरवर्षी ‘रामनवमी’ साजरी केली जाते.

दोन प्रहरि का ग शिरी सूर्य थांबला?

राम जन्मला का ग सखी राम जन्मला

चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस. या दिवशी दुपारी १२ वाजता सूर्य डोक्यावर आल्यावर रामजन्माचा सोहळा होतो. मठात मंदिरात रामनामाचा महिमा समाजाला समजावा यासाठी भजन, कीर्तन, पारायण, गीतरामायणाचे कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात.

काही प्रसिद्ध राम मंदिरे 

नवी मुंबई

ठाणे-बदलापूर रोडवर असलेल्या राम-मारुती मंदिराचे वैशिष्टय़ असे की, अतिशय रेखीव मूर्तींचे या मंदिरात दर्शन होते. येथेही दरवर्षी रामजन्मोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे आयोजन येथील स्थानिक नागरिकच करतात.

जोगेश्वरी

जोगेश्वरी-गेरेगाव येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी श्रीरामजन्मोत्सव भक्तांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. सकाळी आरती, दुपारी रामजन्म आणि त्यानंतर रात्रीपर्यंत अनेक धार्मिक उपक्रम भक्तांसाठी या दिवशी साजरे केले जातात.

वडाळा

 वडाळा राम मंदिराची स्थापना १९५७ साली श्रीमद् द्वारकानाथ स्वामी यांनी केली आहे. या मंदिराला ५०० वर्षांची पंरपरा लाभली आहे. मठाची स्थापना करणाऱ्या स्वामीजींनी गोव्यात पर्तगाळी जिवोत्तम मठाचीही स्थापना केली आहे. या मंदिराचे आताचे गुरुजी श्रीमद् विद्याधीराज स्वामीजी आणि त्यांचे शिष्य विद्याधीश स्वामी या मंदिराचे कार्य पाहतात. रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी वाजता देवत्व प्रार्थना, रथ वास्तू हवन, दुपारी १.५०वाजता राम जन्मोत्सव, महामंगलारती, रथयात्रा, रात्री पूजा असा भरगच्च कार्यक्रम आहे.

भोईवाडा

परळ भोईवाडय़ातील शंकर तानाजी घाडीबुवा मार्गावरील भोईवाडा राम मंदिर. या मंदिराचे साईबाबांच्या पालखीचे आयोजन केले जाते. श्री स्वामी समर्थ सेवा या संस्थेतर्फे या मंदिरातील सर्व सेवा केल्या जातात. रामनवमीचा उत्सवाबरोबरच येथे आध्यात्मिक बालसंस्कारवर्गाचे आयोजनही केले जाते.

गिरगाव

ठाकूरद्वार येथील राम मंदिर ही पाठारे प्रभू समाजाची वास्तू आहे. या मंदिरात सुमारे ३५६ देव आहेत. येथील ‘गोरा राम मंदिर’ आणि ‘काळा राम मंदिर’ प्रसिद्ध आहेत. दुपारी रामजन्मोत्सव आणि त्यानंतर दर्शन, सायंकाळी आरती आणि पुन्हा भक्त मंडळींना दर्शनाचा लाभ घेता येईल.  गोरा राम देवळाचं वैशिष्टय़ म्हणजे राम-सीता आणि लक्ष्मण यांच्या नितांत सुंदर संगमरवरी मूर्ती मुख्य रस्त्यावरूनही दिसतात. गोरा राम मंदिराप्रमाणेच काळा राम मंदिरातही या दिवशी भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येतात. काळ्या रामाची मूर्ती काळ्या रंगाची असून गोऱ्या रामाच्या मूर्तीप्रमाणेच आकर्षक आहे.

दादर

दादर येथील भवानी शंकर रोड, पाध्येवाडी येथील राम मंदिर पुरातन आहे.  रामनवमीनिमित्त चैत्र नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. २४ मार्च रोजी श्रीराम जीवनावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आणि २५ मार्च रोजी भजन, कीर्तन, श्रीरामाची महाआरती आणि ‘श्री राम रंगी रंगले’ होणार आहे.