।। श्री स्वामी समर्थ ।।

>>आदित्य कामत, स्वामी भक्त

येत्या सोमवारी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने

स्वामी समर्थ म्हणजे दत्त गुरुंचा चौथा अवतार. पहिले श्री दत्तगुरु, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, तिसरे आहेत नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वती जेव्हा होते त्यांनी धर्मप्रचार करत जगभर भ्रमण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या कर्दळी वनामध्ये जाऊन तपश्चर्येला ते बसले. तब्बल तीनशे वर्ष तप झाल्यानंतर  त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारुळ तयार केले आणि एकदा त्या जंगलामध्ये एक लाकूडतोडय़ा लाकडं तोडत असताना त्याचा घाव चुकला आणि त्याच्या हातातील कुऱहाड निसटून त्या वारुळावर पडली. ती कुऱहाड श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. त्या वारुळातून स्वामी समर्थ बाहेर आले. तर तोच तो हा दिवस म्हणजे स्वामी समर्थ प्रकटदिन.

श्री स्वामी समर्थांचे पारायण हे दोन ग्रंथांचे होते. एक आहे ‘गुरुलीलामृत’. या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थांनी आपल्या हयातीमध्ये जे जे चमत्कार घडवले आहेत, लोकांना जी जी अनुभूती आली ते त्यामध्ये आहे. दुसरे पारायण होते ते ‘गुरुचरित्रा’चे… त्यामध्ये दत्तगुरुंपासून नृसिंह सरस्वतींपर्यंत दत्तगुरुंनी जे जे चमत्कार घडवलेले आहेत त्याच्याबद्दल लिहिलेले आहे. गुरुचरित्राबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो. आपल्याकडे एकूण चार वेद आहेत. यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे मोठे वेद आहेत तरीसुद्धा ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथसुद्धा पाचवा वेद मानला जातो. त्याचेही पारायण असते. हे पारायण ठरलेल्या वेळेनुसार आणि ठरलेल्या दिवसामध्ये पूर्ण करायचे असते. त्याचे काही नियम आहेत. शक्यतो ते दत्तजयंतीच्या एक आठवडा आधी आणि स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या आधी केले जाते. नामस्मरण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र आहे. त्याचे नामस्मरण केले जाते. नामस्मरण करायचे तर किती जपमाळी करायच्या याचेही काही नियम आहेत. हा जप श्री स्वामी समर्थ नावाने असतो. भक्तांनी दिवसातून किमान अकरा जपमाळी कराव्यात. पण ज्यांना जसा वेळ मिळेल तसा करायचा असतो. पण काही भक्तगणांना तेही शक्य नसते अशावेळी दिवसातून कधीही आपल्याला आठवले तेव्हा केवळ श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले तरी चालतं. कारण आता स्वामी देहात नाही आहेत तर ते या सहा अक्षरी नामात आहेत.

स्वामी समर्थ असे होते की तुम्ही जे प्रेमाने द्याल ते गोड मानून खायचे. त्यांना असेच हवे, तसेच हवे असे काही नव्हते. त्यांचे भक्तगण त्यांच्या परिस्थितीनुसार खावू घालायचे आणि ते खायचे. मग त्यात पुरळपोळी असे किंवा साधी मिठभाकर असो ते हसतमुखाने खायचे. पण त्यांचे एक असायचे की त्यांना अत्तरं फार आवडायची त्यात हिना अत्तर त्यांना अत्यंत प्रिय होतं. अत्तराच्या बाबतीत ते फार ठाम होते, पण नैवेद्य भक्तगण ज्या पद्धतीचा देतील तो त्यांना मान्य होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ हे अजानबाहू होते. अजानबाहू म्हणजे ज्यांचे हात त्यांच्या गुडघ्यापर्यंत पोहोचायचे.

आगळावेगळा अनुभव

एकदा कोडॅकचे कॅमेरामॅन अक्कलकोटमध्ये आले होते. स्वामी समर्थांना न विचारता त्यांच्या नकळत त्यांनी बरेच फोटो काढले. पण गंमत अशी झाली की त्यांचे फोटो प्रिंटच झाले नाहीत. त्यांची चूक त्यांना लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वामींकडे जाऊन त्यांचे फोटो काढण्याची परवानगी घेतली आणि मग फोटो काढले. त्यानंतर आपल्याला त्यांचे फोटो मिळाले. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचा अवतार आहेत. ते केवळ संत आणि ऋषीमुनी नाहीत.