‘श्रीवल्लभ गोविंदा’च्या गजराने डोंबिवली नगरी दुमदुमली; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

2

सामना ऑनलाईन।  डोंबिवली

‘श्रीवल्लभ गोविंदा…भक्त वत्सल गोविंदा’ अशा गगनभेदी घोषणांनी आज डोंबिवली नगरी दुमदुमून गेली. श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने मंत्रोच्चार, वाद्यांचा गजर, टाळमृदुंगांचा निनाद आणि भगवे झेंडे असा जबरदस्त माहोल तयार झाला होता. श्रीदेवी व भूदेवीचा बालाजीसोबत विवाह लागताच लाखो वऱहाडींनी टाळय़ांचा गजर केला तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाहानिमित्त निघालेली भव्य मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. या ऐतिहासिक विवाह सोहळय़ास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आवर्जून उपास्थित होते.

तिरुमला तिरुपती देवस्थान व ओम् श्री साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने या आगळय़ावेगळय़ा  विवाह सोहळय़ाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. त्याचे यजमानपद शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर यांनी भूषविले होते. या विवाहानिमित्ताने अवघी डोंबिवली नगरी विद्युत रोषणाईने लखलखून गेली. चौकाचौकात काढलेल्या रांगोळय़ा आणि स्वागताच्या कमानी लक्ष वेधून घेत होत्या. आज पहाटेपासूनच वऱहाडींची पावले क्रीडा संकुलाकडे वळली होती. सुप्रभात, तोमालसेवा, कुंकुमार्चन, तुलाभार तिरुमंजन, पुष्पयज्ञ आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडले. आयरे रोड येथील विठ्ठल मंदिरापासून श्रीनिवास, श्रीदेवी व श्रीभूदेवी यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक क्रीडा संकुलात आल्यानंतर खास तिरुपतीहून आलेल्या गुरुजींनी महाअभिषेक केला. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यानीही या सोहळय़ाला भेट दिली. याप्रसंगी शिवसेना नेते व ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिकचे संपक्रप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

 उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा सत्कार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ंयाचे या विवाहसोहळय़ाप्रसंगी आगमन होताच उपस्थित लाखो भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. दोघांनीही व्यासपीठावर जाऊन बालाजीची पूजा केली. आयोजकांच्या वतीने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा बालाजीची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळय़ाचे यजमान आमदार सुभाष भोईर यांनी दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.